Wednesday, February 5, 2025

खतांची दरवाढ मागे घेण्यासाठी सुशिलकुमार चिखले यांची केंद्रीय मंत्र्यांकडे विनंती

राजुर (अकोले) खतांच्या वाढलेल्या किंमती शेतकऱ्यांच्या हिताच्या नाहीत त्या त्वरित मागे घेऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करत  राजा हरिश्चंद्र बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुशिलकुमार चिखले यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे करत विनंती केली आहे. 

अगोदरच कोरोना महामारी व महागाई मुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने जबर धक्का बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार असून ही दरवाढ अत्यंत जाचक ठरत आहे. त्यामुळे कोरोना महामारीची परिस्थिती जो पर्यंत सामान्य होत नाही तोपर्यंत कोणत्याही खतांची भाववाढ करू नये अशी विनंती चिखले यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे. 

कोरोना, लॉकडाउन, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा विविध समस्यांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांना रासायनिक खताच्या भाववाढीने आर्थिक संकटात टाकले आहे. रासायनिक खताची निर्मिती करणाऱ्या सर्वच कंपन्यांनी यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी भाववाढ केली. शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खताची गरज ओळखून खत निर्मिती कंपन्यांनी दरवाढ केल्याचे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. जवळपास सर्वच कंपन्यांनी खताचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत अव्वाच्या सव्वा वाढवुन ठेवलेत. असे असताना केंद्रशासनाने कुठलीही दरवाढ मागे घेतली नाही किंवा तसे आदेश सुद्धा खत कंपन्यांना दिले नाही. परिणामी शेती पिकवणे आता शेतकऱ्यांना जिकिरीचे बनले आहे. विशेष म्हणजे रासायनिक खतांच्या जशा किंमती वाढल्या त्या तुलनेत शेतमालाचे दर वाढलेले नाहीत. याचा विचार होणे गरजेचे असल्याचेही सुशिलकुमार चिखले यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles