प्रतिनिधी :- कोरोना साथीच्या या भीषण संकटाच्या काळात सर्वत्र रोजगार बंद झाले आहेत. नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे, त्यामुळे लॉकडाऊन काळातील नागरिकांचे २०० युनिटपर्यंत मागील 4 महिन्याचे वीजबिल पूर्णपणे माफ करावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.
कोविड-१९ च्या संकटामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थती बिकट बनली आहे. या परिस्थती मध्ये त्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे बनलेले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेजमध्ये सामान्य माणसाला कोणतीही थेट मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आता त्वरित राज्यातील नागरिकांचा आर्थिक ताण हलका करण्याच्या दृष्टीने पावले उचलून त्यांना दिलासा देणे गरजेचे बनले आहे.
राज्यात लॉक डाऊन असलेल्या भागात ईमेलने तर शिथिल केलेल्या तालुका व सर्व जिल्ह्यांत आम आदमी पक्षाच्या स्थानिक शिष्टमंडळाने २०० युनिट वीजबिल माफीचे निवेदन जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयात दिली. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वीज मंत्री नितीन राऊत यांना ईमेलने निवेदन देऊन कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वीज बिल माफ करण्याची मागणी करण्यात आली. तसेच याबाबत चर्चा करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या राज्यस्तरीय शिष्टमंडळाची मुख्यमंत्री व वीज मंत्री यांच्यासोबत बैठकीच्या वेळेची मागणी करण्यात आल्याचे आप’ने म्हटले आहे.