कोल्हापूर(प्रतिनिधी):-
महापूर नियंत्रणाच्या उपाययोजनाबाबत किसान सभेच्या वतीने विविध प्रश्न उपस्थित केले होते. आज किसान सभेच्या वतीने पाटबंधारे विभाग, अधिक्षक अभियंता महेश सुर्वे यांना निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली.
मागील वर्षी २७ ते ३० जुलै या काळात प्रचंड पाऊस पडत असताना कोल्हापूर-सांगली-सातारा या जिल्ह्यातील बहुतेक धरणांत मोठ्या प्रमाणावर पाणी साठा होता. २००७ च्या वडनेरे समितीने टप्यााी टप्प्याने पाणी पातळी राखण्याची शिफारस केली होती. त्याची अंमलबजावणी न केल्याने २०१९ मधील २७ – ३० जुलै काळात वारणा, तुळशी, कासारी आणि कुंभी ही चार धरणे अनुक्रमे ८०, ७२, ७६ आणि ७८ टक्के भरली होती. तेव्हा धरणक्षेत्रात येणारा पूर सामावून घ्यायला फारसा वाव नव्हता.
धरणाखालील नदीक्षेत्रातही परिस्थिती पूर वाढवायला कारणीभूत होती. नद्यांच्या नैसर्गिक पात्रात रस्त्यांचचे व पुलांचे भराव, इमारतींची अनधिकृत बांधकामे, पूररेषांची तमा न बाळगता केलेली बांधकामे या कारणांनी पूरस्थिती जास्तच गंभीर झाली. कायद्यानुसार नदी हा कालवा मानल्यामुळे पुराचे नियमन करण्याची संपूर्ण जबाबदारी आपल्या खात्याची आहे. ते नियमन करण्यासाठी प्रशासनाच्या इतर खात्यांच सहकार्य घेणे हा आपला कायदेशीर हक्क आहे. आपल्या खात्याने हे नियमन न केल्याने जनतेला मानवी आणि पाळीव जनावरांची प्राणहानी, उभ्या पिकांचे नुकसान, बुडालेला रोजगार, पडलेली घरे या रूपात हजारो कोटींचे नुकसान सोसावे लागले.
निसर्गाची अतोनात हेळसांड केल्याने कोरोनाच्या रूपातल्या जीवघेण्या संकटाशी आपण आज सामना करत आहोत. अशा परस्थितीत महापुरासारखी आपत्ती येऊन कोसळली तर न भूतो न भविष्यति अशी परिस्थिती होऊन जाईल, असे किसान सभेने म्हटले होते.
किसान सभेने राजाराम बंधारा आणि शिरोळ तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा येथील पाणी मोजण्याची यंत्रणा कार्यान्वित आहे काय? नसल्यास ती केव्हा कार्यान्वित केली जाईल? लाल व निळ्या पूररेषा तसेच, २०१९ च्या पावसाळ्यातील पाण्याची कमाल पातळी दर्शवणारा नकाशा तयार आहे का? असल्यास तो जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करून त्याच्या प्रतिमा सार्वजनिक ठिकाणी लावा. अतिक्रमणांबाबतचा खालील तपशील जाहीर करा, दक्षिण महाराष्ट्रात रस्ते – पूल आदींच्या अशास्त्रीय भरावांमुळे पाण्याचा अतोनात फुगवटा झालेल्या जागा आणि त्या फुगवट्यांचे प्रमाण, अद्ययावत नकाशानुसार नषिद्ध व नियंत्रित क्षेत्रात झालेल्या अतिक्रमणांच्या याद्या. अतिक्रमणे हटवण्यासाठी आपण केलेली कारवाई आणि हटवलेल्या अतिक्रमणांच्या याद्या उर्वरित अतिक्रमणे हटवण्याचा कार्यक्रम आदी मागण्या करण्यात आल्या होत्या.
यावर बोलताना अधिक्षक अभियंता म्हणाले,
पुररेषे संदर्भात काम चालू आहे, आम्ही अधिक माहिती पुर व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडून घेतो. जनतेच्या माहितीच्या दृष्टीने तुम्ही सुचवलेल्या उपायांवर पाटबंधारे विभाग सकारात्मक आहे. निश्चितपणे आम्ही तुमच्यासोबत याबाबत समन्वय साधू. आपण सहभाग असा ठेवावा. पुर व्यवस्थापन आधिकारी यांच्याकडून तुम्ही मागावलेली माहिती आम्ही तुम्हाला पाठवू.
यावेळी किसान सभेचे अमोल नाईक, आप्पा परिट, नवनाथ मोरे उपस्थित होते.