मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणी सापडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनानंतरही आमदारांचा बंड सुरूच असून त्यांनी आसाम मधील गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये तळ ठोकून बसले आहे.
सुप्रीम कोर्टात सोमवारी शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा काढला असल्याचे जाहिर केले. त्यामुळे शिंदे यांच्या बंडाला भाजपचा पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे. अशातच भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात भाजपचं सरकार येईल. आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील. असे चिखलीकर यांनी म्हटले आहे.
तसेच, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन ते आषाढी एकादशी निमित्त पंढपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करतील असं चिखलीकर यांनी म्हटलं आहे. चिखलीकर यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.