मुंबई : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड पुकारले आहे. या बंडामुळे शिवसेने समोर मोठं संकट उभे राहिले आहे, अशात आता शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात मोठा दावा केला आहे.
सुप्रीम कोर्टात आज जस्टीस सूर्यकांत आणि जस्टीस पारडीवाला यांच्या बेंच समोर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी शिंदे गटातील तब्बल 40 आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला असल्याचे शिंदे गटाने स्पष्ट केले. शिंदे गटाच्या या दाव्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडे 115 आमदाराच उरले आहेत. त्यामुळे आता मविआ सरकार अडचणीत सापडले असून सरकार अल्पमतात आले आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीत उपसभापती, राज्य विधानसभेचे सचिव, महाराष्ट्र सरकार, शिवसेनेचे उपनेते अजय चौधरी, शिवसेनेचे सुनील प्रभू आदींचा समावेश आहे. तसेच बंडखोरी केलेल्या आमदारांच्याकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे मांडत आहेत. तसेच शिवसनेकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करत आहेत.
दरम्यान, राज्यातील या सत्तासंघर्षात शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणामध्ये ईडीने समन्स बजावले आहेत. याचसंदर्भातील चौकशीसाठी राऊत यांना उद्या मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.