मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय पेच प्रसंगानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी नंतर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले होते. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची बहुमत चाचणी आज विधानसभेत पार पडली. शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारच्या बाजूने एकूण १६४ आमदारांनी मतदान केले तर, महाविकास आघाडीच्या बाजूने केवळ ९९ आमदारांनी मतदान केले. या निवडणूकीत काही पक्षाच्या आमदारांनी तटस्थ भुमिका घेतली.
शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी शिंदे गटासोबत ४० आमदार गेल्याने महाविकास आघाडी कोसळून शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. विश्वासदर्शक ठराव जिंकून सत्तेवर शिक्कामोर्तब झाला आहे. तर या बहुमत चाचणीने महाविकास आघाडी आणि शिवसेनेला आज दुसरा मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, रविवारी झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत राहुल नार्वेकर यांचा विजय झाला तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव झाला.
शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांची मान्यता रद्द करण्यात आली असून गटनेतेपदी एकनाथ शिंदे हेच राहणार आहेत. यासंदर्भात विधीमंडळाने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत माहिती दिली आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे सुनील प्रभू यांचंही मुख्य प्रतोदपद रद्द करण्यात आलं असून शिंदे गटाकडून मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांना मान्यता देण्यात आली आहे.