मुंबई : आज आझाद मैदानावर ठिय्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण दिवसभर शांतपणे आंदोलन केले. आज मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव व आयसीडीएस आयुक्तांसोबत बैठक घेऊन संपावर तोडगा काढण्याचे मान्य केले होते. तसेच आज कॅबिनेट बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विषयावर चर्चा करण्याचे देखील मान्य केले होते. या बैठका झाल्या परंतु त्यात काय निर्णय झाला याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मुंबईत नसल्याने त्यांनी चर्चा करण्यासाठी पाचारण करण्याचा प्रश्न नव्हता. परंतु प्रधान सचिव शिष्टमंडळाला बोलावून चर्चा करतील अशी अपेक्षा होती. ४ वाजेपर्यंत सर्वांनी धैर्याने वाट पाहिली परंतु निमंत्रण न आल्यामुळे महिलांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्या आक्रमक होत बाहेर जाण्यासाठी धावल्या. त्यांनी बॅरिकेड्स तोडण्यासाठी संघर्ष सुरू केला. काही वेळातच प्रधान सचिवांनी शिष्टमंडळाला बोलावून घेतले. शिष्टमंडळात कृती समितीच्या नेत्या शुभा शमीम, कमल परुळेकर, दिलीप उटाणे, राजेश सिंग, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर, आरमायटी इराणी, माधुरी क्षीरसागर यांचा समावेश होता.
प्रधान सचिव अनुप कुमार यादव, आयसीडीएस आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांनी पेन्शनची योजना बनवण्याचे तसेच ग्रॅच्युइटी लागू करण्याबाबत विचार करण्याचे मान्य केले. अंगणवाड्यांची भाडेवाढ करण्यासाठीचे निकष शिथिल करण्यात येतील. तसेच संप काळात केलेल्या कारवाया मागे घेण्यात येतील. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी व महागाई भत्ता देण्याबाबत मात्र त्यांनी हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याचे सांगितले. मानधनवाढीबाबत पुन्हा एकदा कोणतीही रक्कम किंवा मुदत निश्चित नमूद न करता फक्त आश्वासन दिले. त्यामुळे बैठकीत संपावर तोडगा निघू शकला नाही.
शिष्टमंडळ आझाद मैदानावर परत आल्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली व सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन, ग्रॅच्युइटी, भाडेवाढ आदी मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे असे म्हणत मानधनवाढीबाबत लवकरच विचार करू असे आश्वासन दिले. परंतु त्यांनी देखील कोणतीही रक्कम नमूद केली नाही. त्यांच्या सोबत अनुप कुमार यादव देखील आले होते.
मंत्री महोदय गेल्यावर कृती समितीची बैठक झाली. त्यात चर्चा करण्यात आली. महिलांशी संवाद साधला व शासन लेखी स्वरूपात ठोस निर्णय देत नाही व मानधनात भरीव वाढ करत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला व जाहीर केला. उपस्थित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तो घोषणांच्या गजरात मान्य केला.
संप सुरू ठेवण्याचा परंतु आझाद मैदानावरील ठिय्या आंदोलन समाप्त करत जिल्हा जिल्ह्यांमध्ये बेमुदत तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार दिनांक ८ जानेवारी पासून मुंबई सहित राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोर्चा, धरणे, उपोषण, रास्ता रोको, जेल भरो अशी आंदोलने केली जातील. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कृती समितीने केले आहे.