पुणे : शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि मानधन वाढ, नवीन चांगला मोबाईल, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी येत्या २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे. राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपात सहभागी होणार असल्याचे कृती समितीने म्हटले आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकीत सेवासमाप्ती लाभ द्यावेत, निवृत्तिवेतन सुरु करावे, नवीन मोबाईल, पदोन्नती बाबतचे निकष निश्चित करावेत, आहार, इंधन, प्रवास व बैठक भत्ता मिळावा, मोबाईल रिचार्जची थकीत देयके देण्यात यावीत, उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळाव्यात, वाढलेल्या लोकसंख्येसाठी नवीन अंगणवाडी सुरु करावी, मानधनामध्ये सेवेच्या अवधीनुसार वाढ द्यावी, जादा पदभाराचा अतिरिक्त मेहनताना, साहित्य अंगणवाडीत पोहोच करणे, विविध विमा योजनांचा लाभ, इंधन व आहार दरात वाढ करावी, आदी मागण्यांना घेऊन हा संपन्न होणार आहे.
• असे असतील आंदोलनाचे टप्पे :
1. संपाची नोटीस प्रकल्प कार्यालय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय उप आयुक्त आदींना देण्यात येणार.
2. फेब्रुवारी महिन्याचा मासिक अहवाल कुणीही देणार नाही.
3. धान्य स्वरूपातील आहार किंवा टीएचआर येऊन पडल्यास तो २० तारखेच्या अगोदर वाटून टाकणार.
4. २० फेब्रुवारी पासून अंगणवाड्या बंद राहणार, आहार बंद राहणार, सर्व कामकाज बंद करणार. अंगणवाडीला कुलूप लावणार. संप मिटल्याशिवाय ते कुलूप उघडले जाणार नाही.
5. २० फेब्रुवारी पासून पहिल्या आठवड्यात रोज प्रकल्प, बीट/ सेक्टर पातळीवर आंदोलन करणार.
6. मतदारसंघातील आमदार, मंत्री यांना मोठ्या संख्येने जाऊन निवेदन देणार व विधानसभेच्या २७ पासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा घडवून आणण्याचा आग्रह धरला जाणार.
7. पहिल्या आठवड्यात एक दिवस निश्चित करून जिल्हा पातळीवर शक्ती प्रदर्शन करणार. हे आंदोलन संयुक्त होणार.
8. २८ फेब्रुवारी रोजी आझाद मैदान, मुंबई येथे सर्व संघटनांचे महाआंदोलन
9. ९ तारखेला राज्याचे बजेट सादर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारवर दबाव आणण्यासाठी प्रकल्प/ जिल्हा पातळीवर आंदोलन करणार.