नाशिक : भारताला देश म्हणून बांधण्याचं काम संविधानाने केले आहे. उज्वल भारताचे स्वप्न त्यात आहे. आजचं सामाजिक वास्तव भीषण आहे. त्यामुळे संविधान सभेतील वाद संवाद समजून घ्यायला हवे. महिला आणि दलित सक्षमीकरण याबाबत योग्य समज वाढायला हवी होती. पण घटनेच्या मार्गदर्शक तत्वाला आज हरताळ फासला जातोय. आपले हक्क नाकारले जाऊ नये म्हणून आंबेडकवाद आणि मार्क्सवादी समन्वयाची गरज आहे. असे प्रतिपादन प्रगतशील लेखक संघाचे राष्ट्रीय महासचिव विनीत तिवारी यांनी केले.
“भारतीय संविधान आणि प्रगतिशील लेखक यांची जबाबदारी ” या विषयावर एस.टी. कामगार भवन नाशिक येथे व्याख्यान तसेच कामगार नेते राजू देसले यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, “जमिनीच्या वाटपाबाबत आंबेडकरांचा दृष्टीकोन समजून घेता आलेला नाही. जमिनदारीची पद्धत आजही पूर्णतः नष्ट झालेली नाही. संविधान वाचवायचे आहे. त्याची योग्य अंमलबजावणी करून विकासाचे ध्येय गाठणे गरजेचे आहे. प्रतिगामी चळवळीबद्दल आपण निव्वळ प्रतिक्रिया वादी न होता आपला स्वतंत्र कार्यक्रम विधायकतेने राबवण्याची गरज आहे.
यावेळी आयटक संघटना महाराष्ट्र राज्य सचिव पदी राजू देसले यांची फेरनिवड झाल्याने त्यांचा सत्कार विनीत तिवारी यांच्या हस्ते करण्यात आला. राजू देसले म्हणाले की, ” संविधानाचे महत्व कमी करण्याचे काम सध्या रोज होत आहे. आंतरजातीय जोडप्यांचा सत्कार करणे गरजेचे आहे. आज जाणीवपूर्वक शिवाजी महाराजाची मुद्वाम बदनामी केली जाते. नाशिककरांनी अशावेळी संविधानप्रेमी चळवळ गतिमान करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक महादेव खुडे म्हणाले की, ‘आंबेडकरांचा इशारा खरा ठरतो आहे. मूलतत्वाचा उच्छाद वाढत आहे. महाराष्ट्रात अराजक स्थिती दिसून येत आहे. महिलांची टिंगल केली जाते. लोकशाहीही राजकीय आहे त्याला आर्थिक सामाजिक क्रांतीचे रुप दयावे लागेल. अन्यथा ही लोकशाही टिकणार नाही.’ कार्यक्रमास प्रल्हाद पवार, तल्हा शेख, भीमा पाटील, जयवंत खडताळे, मनोहर पगारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगतिशील लेखक संघाचे राज्य सचिव राकेश वानखेडे यांनी केले. आभार प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद अहिरे यांनी मानले.


