ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती दिनी ज्ञानोत्सव साजरा (ALANDI)
आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील मेदनकरवाडी ( ता. खेड ) पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ओळख श्री ज्ञानेश्र्वरीची या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती दिनी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षातील ज्ञानोत्सव उपक्रमात हरिनाम गजरासह जय हरी माऊली नामजयघोषात सरपंच अमोल साळवे यांचे हस्ते करण्यात आली.
ओळख श्री ज्ञानेश्वरी ची सांस्कृतिक, अध्यात्मिक कार्यक्रमात मेदनकरवाडी येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्री ज्ञानेश्वरी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
प्रशालेत श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सन २०२४ – २०२५ या वर्षभरातील उपक्रमात उत्साही शैक्षणिक वातावरणात श्री ज्ञानेश्वरी जयंती दिनी श्री ज्ञानेश्वरी पूजन, श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिमा पूजन, श्री सरस्वती प्रतिमा पूजन मान्यवरांचे हस्ते करीत उपक्रम शाळेत सुरु करण्यात आला. (ALANDI)
श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे यांचे हस्ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिमा प्रशालेस भेट देण्यात आली. सरपंच अमोल साळवे यांचे कडे प्रशालेसाठी श्री ज्ञानेश्वरी सार्थ प्रत, श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रत तसेच शालेय मुलांसाठी ४०० हरिपाठ वाटप करण्यात आले.
या प्रसंगी सरपंच अमोल साळवे, उपसरपंच महेंद्र मेदनकर, ग्रामपंचायत सदस्य संभाजी मेदनकर, पल्लवी भुजबळ, अमित मेदनकर, संजय वाघमारे, माजी ग्रा.स. जगदीश मेदनकर, अजित मेदनकर, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ भुजबळ, अर्जुन मेदनकर, समन्वयक कैलास आव्हाळे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता गारगोटे, तंत्रस्नेही शिक्षक तुकाराम कुटे, ग्रामपंचायत आजी – माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक वृंद, नागरिक, शालेय मुले उपस्थित होते.
सरपंच अमोल साळवे म्हणले, प्रशालेस अधिकाधिक गुणवत्ता प्राप्त व्हावी यासाठी सर्वोतोपरी मदत आणि सहकार्य केले जाईल. शालेय मुलांच्या सहली तीर्थक्षेत्रातही जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करीत ते म्हणाले, देहू – आळंदी सह राज्यातील स्थान माहात्म्य हे देखील मुलांना माहिती होणे आवश्यक आहे. यासाठी आवर्जून मुलांचे ज्ञानात भर पडावी यासाठी सहली निघाव्यात असे सांगत संवाद साधला. (ALANDI)
यावेळी सरपंच साळवे यांनी या उपक्रमाचे स्वागत आणि कौतुक केले. शालेय जीवनात शैक्षणिक उपक्रमां समवेत संस्कारक्षम उपक्रम राबविले जाणे हे महत्त्वाचे असून ओळख श्री ज्ञानेश्वरी या उपक्रमातून हे कार्य होत असल्याने ते स्तुत्य असल्याचे सरपंच अमोल साळवे यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे यांनी जीवनात ज्ञानेश्वरी, हररीपाठ वाचन केल्यामुळे बाल मनावर कशा प्रकारे धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक मूल्य संस्कार होतात याबद्दल मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबासह आळंदी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या ठिकाणांना एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमासाठी आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. उपस्थितांसह शालेय मुलां समवेत संवाद साधत मार्गदर्शन केले.
ज्ञानेश्वरी जीवनग्रंथ असल्याचे सांगत संत साहित्यासह हरिपाठातून मोठी ऊर्जा प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी उपसरपंच महेंद्र मेदनकर, अजित मेदनकर, तुकाराम कुटे यांनी मार्गदर्शन केले. ओळख श्री ज्ञानेश्वरी ची सांस्कृतिक अध्यात्मिक कार्यक्रमाचे निमित्ताने मेदनकरवाडी गावचे सरपंच अमोल साळवे, उपसरपंच महेंद्र मेदनकर, नवनाथ भुजबळ, इंजिनिअर अजित मेदनकर यांनी मनोगतातून मार्गदर्शन करीत अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.
इंजिनिअर अजित मेदनकर, अर्जुन मेदनकर यांच्या समन्वयाच्या माध्यमातूनओळख ज्ञानेश्वरीची एक सांस्कृतिक उपक्रम अनमोल क्षण ज्ञानेश्वरी जयंती च्या सुवर्ण मुहूर्तावर उत्साहात होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शाळेतील शिक्षक वृंद, विद्यार्थी, तसेच मुख्याध्यापक संगीता गारगोटे उपस्थित होत्या. प्रास्ताविक व आभार तंत्रस्नेही शिक्षक तुकाराम कुटे यांनी केले.