Friday, November 22, 2024
Homeकृषीशेतीचे खाजगीकरण होता कामा नये – आमदार विनोद निकोले

शेतीचे खाजगीकरण होता कामा नये – आमदार विनोद निकोले

महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त कार्यक्रमात प्रतिपादन !

डहाणू : केंद्र सरकारचे विविध धोरण येत आहेत भांडवलदार वर्ग मोठा होतोय पण, शेतीचे खाजगीकरण होता कामा नये असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल डहाणू आणि कृषी विभाग पंचायत समिती डहाणू आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून प्रतिपादन केले आहे.

यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, भारत हा कृषी प्रधान देश म्हणून समजला जातो पण मला तसे काहीच दिसत नाही कारण, आज 4.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशाची तसेच राज्याची अर्थव्यवस्था मुख्यत: कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे. शेतकऱ्यांना दुष्काळ, अतिवृष्टी, अश्या विविध संकटांना सामोरे जावे लागते. जेव्हा शेतकरी, सामान्य जनता एखाद्या लोकप्रतिनिधी ला निवडणून देते अश्या वेळी माझा शेतकरी कसा जगला पाहिजे. त्यांचे उत्पादन कसे वाढेल. याची जबाबदारी त्या लोकप्रतिनिधीची असते. त्याअनुषंगाने आम्ही कृषी मंत्र्यांना पत्र देणे त्याचा पाठपुरावा करण्याच्या हेतूने विधानसभेत प्रश्न उपस्थित करणे आदी कार्य करत असतो. त्याचबरोबर गोखले एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल डहाणू आणि कृषी विभाग पंचायत समिती डहाणू यांच्या वतीने आपल्या भागात विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे शेतकरी जागरूक होत आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान बिरसा मुंडा कृषि क्रांति योजना सन 2020 – 21 अंतर्गत नविन सिंचन विहीर कमी कालावधीत पूर्ण केलेल्या विष्णु बसवत – पावन, यशवंत धोडी – कैनाड, मणी सातवी – दह्याळे या शेतकरी लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विलातपाडा, डोंगरीपाडा येथील 50 महिला शेतकऱ्यांना कृषि विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या पोषण बाग उपक्रमातील लाभार्थी गीता सांबर, देवली राबड, सुनिता यांना भाजीपाला बियाणे आमदार कॉ. विनोद निकोले व इतर मान्यवर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

याप्रसंगी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू आमदार कॉ. विनोद निकोले, पंचायत समिती डहाणू सभापती स्नेहलता सातवी, उपसभापती पिंटु गहला, जि. प. सदस्य ज्योती पाटील, पं स सदस्य राबड, गटविकास अधिकारी पं स डहाणू पल्लवी सस्ते, सहा. गटविकास अधिकारी के.बी.अंजने, प्रभारी कृषि विज्ञान केंद्र कोसबाड डॉ. विलास जाधव, पं स डहाणू कृषि अधिकारी प्रशांत जाधव, डहाणू मंडळ कृषि अधिकारी बोरसे यांच्या शेतकरी वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता.

संबंधित लेख

लोकप्रिय