मुंबई : राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) आज प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यंदा प्रवेशासाठी शासकीय आयटीआयमध्ये ९२ हजार तर खाजगी आयटीआयमध्ये ४४ हजार अशा एकुण १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. यामध्ये एकुण ९१ प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध असुन ८० अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण तर ११ अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण वा अणुत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनासुद्धा कौशल्य प्रशिक्षण मिळून त्यांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी त्यांना ११ अभ्यासक्रमांमध्ये संधी देण्यात येत आहे. दहावीचे निकाल घोषित झाल्यानंतर सविस्तर प्रवेश वेळापत्रक संचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात येईल. तोपर्यंत प्रवेश निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन घेणे तसेच प्रवेश अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज आजपासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.
राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान १ शासकीय आयटीआय सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार ३५८ तालुक्यात ४१७ शासकीय आयटीआय आहेत. त्यामध्ये आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र २ संस्था व ४३ शासकीय आयटीआमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी आश्रमशाळा आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. याचबरोबर राज्यात एकूण ५४९ खाजगी आयटीआय आहेत.
आयटीआय प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा न घेता संबंधीत मंडळांनी निर्गमित केलेल्या दहावीच्या गुणपत्रिकेतील गुण व प्रवेश नियमावलीनुसार निर्धारित गुणाधिक्य याआधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करुन निर्धारित प्रवेश नियमावली व पध्दतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
शिकाऊ उमेदवारी योजनेतून विद्यावेतन
शिकाऊ उमेदवारांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या दरानुसार प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यावेतन मिळते. या योजनेअंतर्गत राज्यातील साधारण ११ हजार औद्योगिक आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या एकूण १ लक्ष जागा स्थित करण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान, प्रवेश प्रक्रिया सुरु होताच अवघ्या काही वेळातच १५ इच्छूक उमेदवारांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केले. संचालनालयाच्या https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.