Saturday, March 15, 2025

माणूस हत्तींबाबत संवेदनशील होणार का?

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

               शेती व फळबागा रानडुक्कर व इतर वन्य प्राण्यांपासून वाचवण्यासाठी शेतकरी अनेक उपाय करतात. त्यापैकी एक म्हणजे दबावाने फुटणारे फटाके खाद्य पदार्थात ठेवून त्यांना खायला देणे. हे प्राणी जेव्हा ते खातात तेव्हा तोंडात स्फोट होऊन त्या प्राण्यांना हानी होते व ते पळ काढतात. असेच एक अननस हत्तीने खाल्ले आणि केरळच्या अट्प्पाडीच्या सीमेवरील सायळेंंत व्हॅली जंगलातील गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला. शक्तीशाली फटाके तिच्या तोंडात फुटल्याने या हत्तीणीचा जबडा तुटून जबर दुखापत झाली होती. २७ मे रोजी या गर्भवती हत्तिणीचा पलक्कड जिल्ह्यातील वेळियर नदीतच मृत्यू झाला.

          या मानवी क्रोर्याच्या घटनेवर समाजमाध्यांतून टिकेचे सत्र सुरू झाले आहे.

          वनविभागाचे अधिकारी मोहन कृष्णन यांनी यांनी आपल्या फेसबुक पेजवर ही दुःखद घटना उघडकीस आणणारं भावनिक पोस्ट टाकल्यानंतर हा मुद्दा समोर आला. त्यांनी लिहिले, “जेव्हा आम्ही तिला पाहिले तेव्हा ती नदीत उभी होती, तिचे डोके तिने पाण्यात बुडवले होते. तिचाला सहाव्या ज्ञानेंद्रियातून ही माहिती असावी की आता ती मरणार आहे. तिने नदीत उभ्या स्थितीत जलसमाधी घेतली..” कृष्णन यांनी आपल्या सहकार्‍यांसह हत्तीणी परत किनार्‍यावर आणले नदीच्या पाण्यात उभ्या असलेल्या हत्तींनीचे फोटोही त्यांनी पोस्ट केले.

मागच्या एप्रिल महिन्यात कोलम जिल्ह्यातील पुनालूर विभागांतर्गत पठाणपुरम वनपरिक्षेत्रात अश्याच प्रकारे एका हत्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आता मिळाली आहे. हा हत्ती आपल्या कळपापासून विलगून हरवला होता. पठाणपुरमातील जंगलांच्या सीमेवरील भागातून हत्ती वनाधिकार्‍यांना गंभीर अवस्थेत सापडला होता. नंतर त्याचा मृत्यू झाला. त्याचाही जबडा स्फोटमुळे तुटलेला होता आणि तो खाण्यास अक्षम होता. हत्तीला फटाक्यांनी भरलेल्या अन्नवस्तू चारली गेली आणि आणि ती तिच्या तोंडात फुटली. 

२ मे पासून चेंज ऑर्ग वर ऑनलाईन याचिका सुरू केली आहे. कायदा व न्याय मंत्रालयाने याची दखल घेऊन मानवी क्रौर्याचा बळी ठरलेल्या गर्भवती हत्तीला न्याय मिळावा व ज्यांनी हा भयंकर गुन्हा केला आहे त्यांना अटक केली जावी हा या याचिकेमागचा हेतू आहे. “वन्यजीव गुन्ह्यासंदर्भात भारताचा कायदा दीर्घ कारावासाची शिक्षा करत नाही. वन्यजीव हत्येच्या आरोपाखाली दोषींना कठोर दंड ठोठावण्यात आले पाहिजे” असं नमूद केलेल्या या ऑनलाइन याचिकेला आतापर्यंत ५० हजार लोकांचा समर्थन मिळाला आहे. 

दुसरीकडे भाजप व संघ परिवाराकडून याचा राजकीकरण करण्याचे प्रयत्न त्यांच्या आयटीसेल कडून सुरू झाले आहे. हत्तीच्या मृत्यूसाठी साक्षरता आणि मालप्पुरम जिल्ह्यातील मुस्लिम बहुल लोकसंख्या जबाबदार असल्याचे बिनबुडाचे आरोप सुरू झाले आहेत. स्वतः मनेका गांधी यांनी याप्रकरची प्रतिक्रिया दिली आहे. मुळात सबरीमला पासून तर सर्व प्रकारचे शर्थीचे प्रयत्न करून ही भाजपला तिथले मतदार भाजपला महत्व देत नाहीत. हेच भाजप आणि संघाचा अवघड जागेचं दुखणं झालं आहे. अमित शहा आणि मोदींना तिथे कोणी विचारात नाही. कोविड संक्रमणाशी लढण्यसाठी पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकींसाठी केरळ मॉडेल यशस्वीपणे राबवणारे केरळचे मुख्यमंत्री जात नाहीत व त्याला वेळेचा अपव्यय म्हणल्याने मोदीभक्तांच्या फार जिव्हारी लागले आहे. त्यामुळे केरळ त्यांच्या निशाण्यावर नेहमीच राहतो.


हत्ती आपल्या कळपांसह रोज अनेक मैलांचा प्रवास करतात. बर्‍याच ठिकाणी विद्युत तारा लावून त्यांचे वावर प्रतिबंधित केले जातात. हत्तीवर झालेल्या हल्ल्याचे मूळ मानवी वस्तीजवळ हत्तींचे कळप फिरकल्याने नुकसानीच्या संकेत आहेत. मानवी वसतींपासून लांब ठेवण्यासाठी विद्युत तारा लावण्यात येतात. हत्तीं-मानव संघर्षात हत्तींची हानी होण्याचा हा महत्वाचा कारण आहे. 

             जगातील आशियाई हत्तींपैकी ५० टक्क्यांहून अधिक हत्ती भारतात आहेत. २०१७ च्या हत्तींच्या गणने प्रमाणे भारतात २७,३०२ हत्ती होते. सर्वाधिक हत्ती कर्नाटक (६,०४९) त्यानंतर आसाम (५,७१९)आणि केरळ (३,०५४) होते. हे २००९ ते २०१७ दरम्यान दरवर्षी जवळपास ५० या दराने ४६१ हत्तींचा मृत्यू ह्या विद्युत धक्क्याने झाला. यात कर्नाटकमध्ये १०६, ओडिशाराज्यात ९०, आसाम राज्यात ७०, तमिळनाडूत ५०, पश्चिम बंगाल राज्यात ४८, छत्तीसगडमध्ये २३ असा प्रमाण आहे. केरळ राज्यात तिसर्‍या क्रमांकावर सर्वाधिक हत्ती असूनही तिथे घेण्यात येत असलेल्या काळजीमुळे १७ हत्ती विद्युत तारांच्या धक्क्यामुळे मरण पावले. वनक्षेत्र संकुचित होणे, अधिवासातील संपुष्टात येणे, हस्तिदंतची तस्करी, मानववंशिक दबाव या सर्व प्रकारच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. 

              माणसाची हत्तींना मिळणारी क्रूर वागणूक इथेच थांबत नाही. माणसांना हत्ती मिरवण्याचा जो आनंद मिळतो त्याचा ही बळी हत्तीच ठरलेला आहे. २०१४ साली सातारा जिल्ह्यात पाल येथे खंडोबा जत्रेत देवाचा हत्तीच्या डोळ्यात लोकर गेल्याने तो बिथरला. चेंगराचेंगर झाली व एक भाविक महिला खंडोबा कडे गेली. तीन डझन लोक चांगलेच जखमी झाले. हत्ती बिथरण्याची ही अशी एकमेव घटना नाही. केरळच्या धार्मिक उत्सवांमध्ये हत्ती मिरवले जातात. या मंदिर उत्सवांमध्ये २००७ ते २०१३ दरम्यान हत्ती बिथरल्याच्या २,८९६ घटना घडल्या. या घटनांमध्ये ४२५ हत्ती महावतांकडून मिळालेल्या अमानुष वागणुकीमुळे मेलेत, आणि १८३ महावत या हत्तींच्या पायाखाली तुडवून मरण पावले. केरळ राज्यात मागच्या १२ वर्षांत २१२ लोकं या मंदिरांच्या पाळीव हत्ती बिथरल्याने मेले. भारतभरात जवळपास ३,५०० पाळीव हत्ती आहेत, त्यातील बहुतांश दक्षिण भारतात आहेत, केरळ राज्यात त्यातील सुमारे ६०० हत्ती आहेत. ‘देवाचा स्वतःचा देश’ म्हटल्या जाणार्‍या केरळ जानेवारी ते एप्रिल हे तिथल्या लोकांसाठी आनंद व उत्सवांची पण हत्तींसाठी सर्वात क्रूर दिवसे असतात. पण मग हत्ती असे का बिथरतात? शुभ कार्यांची सुरुवात ज्या गणेश पूजेने होते त्याचे डोके देखील योगायोगाने हत्तीचेच. मग देव त्यांना न बिथरण्याची सदबुद्धी का देत नाही?

             धार्मिक उत्सवांमध्ये जोश व आनंद शिगेला पोहोचलेला असतो. धार्मिक उत्सवांमध्ये या हत्तींची सुमारे ३५-४० डिग्री तापमानात परेड सजवून परेड काढली जाते. गर्दीतून ढोल-ताशे व फटाक्यांच्या गजरात गरमीने तापलेल्या काळ्या डांबर रोडवर पाय भाजत असलेल्या हत्तीची छान पैकी मिरवणूक काढली जाते. उत्सवात सहभागी सर्व लोक छान जुते-चप्पला घालून चालत असतात. ही ‘सदबुद्धी’ माणसाचीच मक्तेदारी! बिच्चारा हत्तीच्या पायात चटके लागतात. पण त्याला बुटा-चपला घालता येत नाही. तो चालतो, डोक्यावर बसलेला महावत हुक किंवा टोकदार खिळ्याने (छानसे नाव- अंकुश) मारा करत त्याची उठ-बस, दहीने-बाए, सावधान-विश्राम करत हत्तीची पलटण पुढे नेतो. पुढेदेखील अनेक मदिरांचे ऑर्डर पुरवायचे असतात. या यात्रेत तासन्तास उभा असलेले कित्येक हत्तींची मागच्या अनेक दिवसांपासून झोप झालेली नसते, तो पोटभर जेवला नसतो, विश्रांति मिळालेली नसती, आजारावर उपचार घेतला नसतो, पानी पिलेला नसतो. हत्तीचे केस बाळगल्याने नशीब उजळते या आशेने लोकं हत्तीच्या शेपटी व त्वचेवरची केस उपटततात ज्याने हत्तीला चिडचिड होते. पण चिंता नाही, हत्तीच्या मालकाला एक लाख ते ७५००० च्या दरम्यान भाडे भेटणार आहे. एका दिवसाच्या कामाचे इतके पैसे कोण देतो (देवस्थाने सोडून), मोठा भांडवलदार पण देणार नाही. पैसे मिळाल्याने हत्तीचा मालक खुश, मंदिराचा वैभव वाढल्याने पुढे भक्तगण व पर्यायाने देणगी वाढेल म्हणून मंदिर व्यवस्थापन खुश, लोक खुश ! मंदिराचा हत्ती सोडून बाकी सर्व माणसं खुश. हत्ती बिथरण्याची घटना रोज थोडीनं होते. सणांच्या सीझन मध्ये मंदिरांना ५० हजार ते १ लाख प्रतिदिवस भाडे आकारून पैसे कमावले जातात. हत्तीचा धंदा मोठा नफा देणारा आहे. म्हणूनच तर पूर्वोत्तरच्या जंगलांतून ३०-४० लाखांत एक हत्ती खरेदी केला जातो. 

            जंगलातून पकडून बांधून ठेवण्यात आलेले हे हत्ती केरळ, अरुणाचल प्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू व पश्चिम बंगाल ह्या राज्यांत सामंती वृत्तीच्या लोकांसाठी ‘स्टेटस सिंबॉल’ आहेत. या हत्तीची मालकी मंदिर व्यवस्थापन किंवा खाजगी हाती असते. पाळीव केल्यानंतर त्यांच्याकडून अत्यंत मेहनतीची कामे घेतली जातात. या पाळीव हत्तींचे जीवन नरकाचे झाले असते. त्यांचे पाय, प्रामुख्याने मागाचे पाय जाड साखळीने बांधल्यामुळे सुजले किंवा जखमी झाले असते. खोल जखमा, वाढते रोग संक्रमण व सुजलेले पाय घेवून फटाक्यांच्या कानफाडू आवाज व चटके झेलत हे हत्ती कितीतरी तास पारंपरिक मंदिर उत्सवांची शोभा वाढवत उभे राहतात. त्या सीझनमध्ये उपलब्ध असलेल्या महावताला देखील हत्तीच्या व्यवहाराचा अंदाज नसतो. हे महावत टोकदार लोखंडी किंवा लाकडी काठीने मारून हत्तीला नियंत्रण करतात. हत्तींना नियंत्रित करत असतांना हत्तींच्या सुमारे १०७ अत्यंत संवेदनशील अंगांवर मारा केला जातो. हत्तीला जखम झाल्यास खर्चाच्या भानगडीत न पडता जखमेवर चुना किंवा कोळश्याची पूड लावून ‘आयुर्वेदिक’ उपचार केले जाते किंवा अस्वच्छ कपड्याने ते बांधले जाते. चालण्याचा सराव करण्यासाठी दुपारच्या रणरणत्या उन्हात डांबर रोडवर चालायला लावले जाते ज्याने सपाट पायाच्या ह्या प्राण्याच्या तळव्यावर चट्टे पडतात, ज्याने छयरोग अथवा हर्पिज होवू शकते. हत्तींना ऊन, पाऊस, थंडी या सर्व मोसमांत बाहेरच ठेवले जाते, त्यासाठी शेड व सावलीची व्यवस्था नसते. गम्मत म्हणजे प्राणी छळ प्रतिबंध कायदा अस्तीत्वात असतांनाही पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचे काही पडलेले नसते.

हत्ती राहतात तेथे पाण्याची कमतरता असते, खायला स्वस्त रेशेदार केरीयोता पाम पाने असतात. ३०० वर्ग किलोमीटर मध्ये चरण्याची सवय असलेला ह्या प्राण्याच्या चरण्यावर प्रतिबंध घालून केवळ सुक्या किंवा पत्त्यांच्या हिरव्याचार्‍यावर जगवला जातो. चर्‍यात असलेल्या रेशा अतड्यांत अडकल्याने अनेक पाचनक्रियेचे आजार जडतात. हत्तीला साखळीत बांधून एका ठिकाणी बांधून ठेवणे हा त्यासाठी एक शिक्षा असते. साखळीने त्वचा घासल्यागेल्याने व जखमांमुळे पाय, डोकं, मान, आशा अनेक ठिकाणांची त्वचा गळून पळून तिथे शरीराच्या रंगापेक्षा वेगळी दिसून पडणारी पांढरी चमडी दिसून पडते. दोन्ही कानांत माणसांप्रमाणे छिद्र करून त्यात तार-लोखंडांचे वाजणारे मोठे-मोठे घुंघरू टाकण्यात येतात. जंगलात कळपात वावरणार्‍या या सामाजिक प्राण्याला त्याच्या इतर हत्ती मित्रांशी भावनिक नातं बनु नये म्हणून त्याला वेगळ ठेवण्यात येते. रात्री रस्त्यावर सडली-किडलेली म्हणून फेकण्यात आलेल्या भाज्या व फळे यांना खायला दिले जाते. जंगलात हत्ती सुमारे २०० प्रकारच्या विविध गवते, झाडे, पानं, खोड, मुळं, आदींवर मजेणे जगतो. इथे रोजचं एकसारख बेचव खाद्य. मंदिरांमध्ये पळण्यात आलेल्या हत्तींसाठी जागेची भयंकर कमतरता असते. उभं राहायची जाग्यावरच गोबर व मूत्र जमा झाल्याने भयानक दुर्गंधी पसरलेली असते. स्वतः यातना भोगत असलेले हे हत्ती भक्तगणांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात. 

जंगलात मनसोक्त हिंडुन, भांडून किंवा प्रत्यक्ष संभोगातून टेस्टेस्टोरोन होर्मोनचे नैसर्गिक नियोजन तरी होते. पण इथे तरुण वयातल्या हत्तींना समागमासह सर्व  संधी  नसल्याने व त्यांच्यात होर्मोनची पातळी वाढल्यावर ते आक्रमक व्यवहाराने व्यक्त करतात व स्वतःला इजा करून घेतात. वास्तव पाहता या मास्थपूर्व काळात हत्तीला आराम, शीतल वातावरण, खुप सारा पानी व विशेष आहाराची गरज असते, जो त्यांना कधीच मिळत नाही. बहुतांश प्रकरणात हत्ती बिथरला की तो ‘त्या’ काळात असल्याचे सांगून हत्तीवरच खापर फोडण्यात येते. महाराष्ट्रात सुंदर हत्तीच्या प्रकरणात देखील हेच खोटे सांगण्याचे प्रयत्न झालेत.

या पैकी बहुतांश हत्ती ‘भारतीय वन्यजीवन (संरक्षण) कायदे, १९७२ चे उल्लंघन करून गैरकायदेशीररित्या कलबाह्य झालेल्या किंवा बनावट मालकी प्रमाणपत्राच्या आधारावर ठेवण्यात आले आहेत. सप्टेंबर २०१४ साली मद्रास हाय कोर्टच्या मदुरई बेंच समोर अशा मंदिर उत्सवांवर बंदी घालण्यासाठी जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली. यातूनच कोल्हापूरच्या मंदिरातून एका हत्तीला मुक्त करण्याचे निर्णय मुंबई हाय कोर्टने मागच्या वर्षी दिले. खरं तर या अशा सार्वजनिक कार्यक्रमांना प्रतिबंध घातले पाहिजे. १८ ऑगस्ट २०१८ साली केरळ राज्यातील हत्तींवरील अत्याचारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आला.               

            यात दरम्यान पुरेशी जागा असेल मिरवणुकीत हत्ती वापरल्यास त्यांच्यात पुरेशी जागा, उत्सवात मठातील कोणतेही हत्ती वापरले जाऊ नये, तसेच आजारी, जखमी, कमकुवत किंवा गर्भवती हत्ती वापरली जाऊ नये, त्यांच्यावर काटे किंवा बार्ब्ससह साखळ्या आणि हॉब्ल्स टिथरिंगसाठी वापरली जाऊ नये, उन्हात लांबलचक प्रवास रस्ते असल्यास विश्रांतीशिवाय त्यांना चालवले जाऊ नये, दीर्घ कालावधीसाठी जोरदार उन्हात हत्ती उभे करणे किंवा हत्ती जवळ फटाके फोडण्यासाठी परवानगी दिली जाऊ नये, पुरेसे अन्न व पाणी दिले जावे, गरम उन्हात सावलीची व्यवस्था मिरवणुकीच्या वेळी मिरवणूक हत्तींना बेड्यांची साखळी त्यांच्या पायाशी बांधली असावी आदि तरतुदी करण्याचे आदेश दिले. 

आपण आपल्या देखाव्यासाठी, पुण्यापापाच्या हिशोबांसाठी हत्तीसारख्या समजदार व संवेदनशील प्राण्याचा बळी घेत आहोत. वास्तवात कोणत्याही धार्मिक ग्रंथात हत्तींची मिरवणूक काढावी, देवाला खुश करण्यासाठी त्याचा नैसर्गिक हक्क हेरवून घेवून त्याचा छळ करावा असे एका अक्षरानेही नमूद नसतांना आपण आपले नाद भागवण्यासाठी केवळ आंधळी भक्ती, मौज, भव्यतेचा देखावा व त्यात गुंतलेले आर्थिक हितसंबंध अशा कारणाने गैरकायदेशीर व अनैसर्गिक नीचपणा परतो. एका धार्मिक कथेत हत्तीचे पाय मगरीने पकडल्यावर स्वतः देव येवून त्याला वाचवतो, पण शेवटी ती कथाच! जेव्हा हत्ती बिथरतो, तेव्हा त्याच्या पायाखाली मारणार्‍यांना, किंवा पुन्हा-पुन्हा बिथरलेल्या हत्तीची कत्तल केल्यास व मंदिरांकडून धार्मिक उत्सवांच्या देखाव्यात त्यांचे हाल केल्यास या माणूस व हत्ती या दोघांनाही वाचवण्यासाठी कोणीच येत नाही. आपल्या कर्माची फळे आपण तर भोगतोच पण त्या नादात हत्तीचाही बळी आपण विनाकारण घेतो.

प्राण्यांच्या प्रदर्शनातून आनंद घेणार्‍या माणसाने सर्कसमधेही प्राण्यांना नाचवून पैसे कमावले आहे. आज अनेक देशांमध्ये वन्य प्राण्यांवर बंदी असली तरी एक काळ होता जेव्हा हत्ती सर्कसच्या यशाचा हुकूमी एक्का होता. परंतु त्यामागे हत्तीला किती सोसावे लागले हे अनेक दशकांनीच जगासमोर आले. जगात कसरती करण्यात तरबेज असलेला पहिलं हत्ती ‘लिटल बेट’ होता. तो १८२१ साली अमेरिकेत दाखल झाला. या हत्तीला गुडघे टेकणे, एक पाय पुढे करणे, संतुलन राखणे, मान हलवणे, ऊठबस, शिट्ट्या वाजवणे, सूंडवर लोकांना उचलणे आदि कसरती करायचं. या हत्तीच्या मालकाने जाहिराती केल्या की या हत्तीची कातडी इतकी जाड आहे की त्याला गोळीही भेदू शकत नाही. ३१ जुलै १८२२ साली याच खोट्या प्रसिद्धी मुळे या हत्तीचे जीव गेले जेव्हा एका मुलाने खरेपणा माहीत करण्याच्या नादात हत्तीच्या डोळ्यात गोळी मारून त्याला ठार केले. खेळ करणारा तेव्हाचा एकटाच हत्ती होता. 

             हत्तीला ज्या ‘जंबो’ नावाने ओळखतो त्याची ही अशीच शोकांतिका आहे. जगातील सर्वात मोठी सर्कस उभारणाच्या ध्येयाने पछाडलेल्या पी.टी.बर्नम यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात लंडनच्या एका प्राणिसंग्रहलयाकडून एक तरुण हत्ती खरेदी केला. जाहिरातबाजीत जरबेज असलेल्या बरणाम यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे याची धमाल बाजारू जाहिरात उडवली. त्याला जगाचा सर्वात मोठा हत्ती असे सांगून १८८२ साली न्यू यॉर्क शहरात “त्याच्या महान जातीचा हा सर्वात ऊंच बादशाह आहे, या सम दुनिया कधीच दुसरं पाहणार नाही” म्हणून परेड घडवून आणली. जम्बो बर्नमच्या सर्कसची ओळख बनला. १५ सप्टेंबर १८८५ रोजी जम्बो हत्ती रेल्वे रूळ ओलांडताना अचानक बिना वेळापत्रकाच्या धावणाऱ्या रेल्वे गाडीची धडक लागून मरण पावला तेव्हा बर्नम ने अफवा पसरवली की एका छोट्या हत्तीचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात त्याला पुढे ढकलून जम्बो रेल्वे गाडीच्या तावडीत सापडला आणि शाहिद झाला. बर्नमने त्याची टॅक्सीडर्मी कातडी आणि हाडाच्या सांगाड्याला ‘डबल जम्बो’ म्हणून सर्कस व प्रदर्शनांमध्ये सादर  करण्यात आले. त्याच्या अवशेषांच्या बाजूला एलिस नावाच्या हत्तीणीला उभं करून तिला जम्बोची विधवा म्हणून लोकांना भावनिक केले गेले. यातूनही बर्नम ने भरपूर प्रसिद्धी व पैसा कमावला. जम्बो हा त्यावेळी हत्तीला कश्या चुकीच्या पद्धतीने ठेवले जायचे याचेही एक उदाहरण आहे.

           त्यावेळी सर्कस आणि प्राणिसंग्रहालयांना नर हत्तीच्या शारीरिक व मानसिक अवस्थेबाबत फारशी माहिती नव्हती. नर हत्ती आकाराने मोठे असल्याने लोकांची गर्दी ओढण्यासाठी फायदेशीर असल्याने जमवले जायचे. ते हत्तीणीला देखील नर म्हणून प्रचारीत करायचे. सर्कसला नर हत्तीची गरज पुनरुत्पादनासाठी देखील असायची. परंतु सर्कस व प्राणिसंग्रहालय या दोघांना नर हत्तीच्या ‘मस्थ’ म्हणजे वयात आल्यावर त्यात रासायनिक उत्प्रेरक किंवा हॉर्मोन्स मुळे होणाऱ्या शारीरिक बदलांबाबत माहिती नव्हती. वयात आल्यावर हत्ती समागम न झाल्यास नैसर्गिकरित्या आक्रमक व धोकादायक बनून जायचे. यासाठी त्यांच्यात वाढलेले पौरुष हॉर्मोन्स जबाबदार असताना त्यासाठी हत्तीलाच दोषी धरले जायचे. अश्यावेळी या तरुण हत्तींना पागल समजून गोळी मारून ठार केले जायचे किंवा जाड साखळदंडांनी बांधून तरी ठेवले जायचे. जम्बोचा आक्रमकपणा देखीक याच कारणाने होता. हेजनबेक यांनी याच कारणांनी नर ऐवजी मादा हत्तींची खरेदी विक्री वाढवली होती. 

            भारताची जगभरात एक ओळख हत्तींनी आहे. १९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर १९८२ या काळात दिल्ली येथे ९ वे आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या अंतराष्ट्रीय आयोजनाचा लोगो एक अप्पू नावाचा छोटा हत्ती होता. हा नाव तेव्हा इतका जगभर गाजला की या नावाचा फायदा घेण्यासाठी नेपाळच्या एका नवख्या सर्कस पथकाने आपल्या सर्कसचे नाव ‘अप्पू सर्कस’ म्हणून ठेवले. गुरुवायूर देवस्वाम इथल्या अप्पूला दिल्ली एशियाडमध्ये १४ रोजी १९८२ च्या दिल्ली एशियन गेम्सचा शुभंकर म्हणून भाग घेतल्यानंतर वयाच्या पाचव्या वर्षी झटपट प्रसिद्धी प्राप्त झाले. परंतु दोन वर्षांनंतरच अप्पू पालक्क्ड येथे चुकून सेप्टिक टाकीमध्ये घसरला आणि त्याचे पाय पाय मोडले. अप्पू २१ वर्षे आजाराने झुंझ देत राहिला आणि कधीही बरा होऊ शकला नाही. १४ मे २००५ रोजी तो त्याच अवस्थेत मरण पावला.

            केरळच्या प्रकरणात केरळ वन विभागाने त्याच्या ३ जूनच्या ट्विटद्वारे गुन्हा नोंदवल्याची माहिती दिली परंतु त्यांनी असे ही विचारले आहे की, “भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद -१-ए (जी) मध्ये असे म्हटले आहे की सजीव प्राण्यांबद्दल करुणा बाळगणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असेल. चित्रातील गर्भवती हत्ती मानवी-वन्यजीव संघर्षात ठार झाली. कारवाई अगोदरच सुरू केली गेली आहे. पण आमचे कर्तव्य कोठे आहे? आणि मानवता ??” 

             अभिनेत्री व दिग्दर्शिका पुजा भट यांनी आपल्या ट्विटर खात्यावर लिहिले, “आम्ही गणपतीची पूजा करतो आणि हत्तींना मारतो व गैरवर्तन करतो. आम्ही भगवान हनुमानाची पूजा करतो आणि माकडांना बेड्या घालून आणि विद्रूप कळ्तृप्त्यांचा आनंद घेतो. देवीची पूजा आणि आदर करतो आणि स्त्रियांवर ताकद आजमावतो, अत्याचार, करतो, टिंगल करतो आणि भ्रूणहत्या करतो. 

                केरळमध्ये ज्याप्रकारे माणूस- वन्यजीव स्पर्धेत २ हत्तींचा जीव घेण्यात आला तो अमानुष मानवी विकृतीचा आणि असंवेदनशीलतेचा टोक आहे. वनात मुक्त विहार करणारे हत्ती असो, मंदिरात असलेले पाळीव हत्ती असो किंवा सर्कसचे हत्ती असो हत्ती माणसाचा सर्वात जवळचा वन्यमित्रा आहे. त्याच्याशी कसं वागावं हा शेवटी प्रश्न विवेकवादाचा, कायद्याचा व वैज्ञानिक विचारप्रणालीचा आहे, त्यातूनच सोडवला जाऊ शकतो. 

ऍड.संजय पांडे

adv.sajaypande@gmail.com

Related Articles

- Advertisement -

Latest Articles