Prakash ambedkar : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी मध्ये युती संदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप यावर तोडगा निघू शकलेला नाही. अशात वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.
महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची बोलणी सुरु असतानाच वंचितने लोकसभेसाठी तीन उमेदवार जाहीर केले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी अकोल्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लोकसभेच्या तीन जागांवरील वंचितचे उमेदवार जाहीर केले आहेत.
ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश आंबेडकर हे स्वत: अकोल्यातून लढणार आहे तर वर्धा येथे प्रा. राजेंद्र साळुंखे आणि सांगलीतून चंद्रहार पाटील यांना वंचितकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. वंचितच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत सोबत युती होणार का याबद्दल अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
दरम्यान, मविआला प्रकाश आंबेडकरांची मनधरणी करण्यात यश न मिळाल्यास 2019 प्रमाणे वंचित बहुजन आघाडी पुन्हा ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत दिसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.