Friday, March 14, 2025

कोरोनाने शिकविलेला एक धडा… – महामाया…

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

         या पृथ्वीतलावर मानवाचं स्वतंत्र एक साम्राज्य होतं. परंतु सत्तेच्या हव्यासापोटी व भौतिक चैनीसाठी मानवानं पृथ्वीला पर्यायाने निसर्गालाचं गिळकृत करायला सुरूवात केली होती. जी पृथ्वी मानवाला न मागता भरभरून देत होती. त्याच पृथ्वीला मानव स्वार्थापोटी नष्ट करीत सुटला होता. तो कुणाचंही ऐकण्याच्या मन : स्थितीत नव्हता. सरळ साधं आयूष्य जगणं त्याला मान्यच नव्हतं. तो नुसता धावतचं होता. त्याच्याकडे थांबायला तसूभरही वेळ नव्हता. त्याला गरजेपेक्षाही जास्त मिळवायचं होतं. त्यासाठी तो वाटेल ते करायला तयार होता. पृथ्वी हे सार पहात होती. सहन करत होती. अधून – मधून आपला रुद्रावतार दाखवून ती विविध रूपात मानवाला झटकेही देत होती. परंतु मानवं हार मानणाऱ्यापैकी नव्हता. त्याला कुणाशीही, काहीही देणं – घेणं नव्हतं. आपल्याच नादात, तालात, सुरात तो बेधुंद वागत होता. त्याला हवं ते मिळविण्यासाठी जीवाचं रान करीत होता. पण, कोण जाणे? 

          मानवाचं हे बेभान वागणं नियतीला मान्य नव्हतं. एक दिवस अचानकपणे कोरोना नावाच्या विषाणूने मानवाच्या जगात प्रवेश केला. पृथ्वीवर चौफेर त्याने हात – पाय पसरले आणि बघता – बघता मानवाच्या शरीरात प्रवेश करून जीवघेणा हल्ला करीत होता. लाखो मानवाला त्यानं मृत्यूच्या कवेत घेतलं. मानवाचं धावणचं त्यानं क्षणार्धात थांबवलं. मानवाला घरातचं कैद केलं. तोंडावर बैलाच्या तोडाला मुगंस लावतात त्यासारखी पट्टी ( मास्क ) बांधायला आणि वारंवार हात धूवायला भाग पाडलं. नाईलाजाने मानव एकमेकापासून अंतराने राहू लागला. रस्ते , गल्ल्या ओस पडू लागल्या. जो ऐकत नव्हता, तो त्याला संपवू लागला. परंतु या विषाणूच्या हल्ल्यात परस्पर विरोधाभासही दिसू लागले. 

             कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी सरकारने अचानक लॉकडाउन केलं. त्यामुळे इतर परराज्यातून मोलमजूरीसाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले गरीब मजूर , कष्टकरी कामगाराच्या हातचं काम पुर्णत: बंद पडलं. शेवटी नाईलाजाने श्रमिक मजूर पोटाच्या भुकेसाठी व मुत्यूच्या भितीपोटी स्वगावी जाणेसाठी मिळेल त्या वाहनाने लपून छपून जीवघेणा प्रवास करीत होते. तर कुणी मैलोन मैल, रात्र – दिवसं तळपत्या उन्हात उपाशीपोटी आडवाटेनं तान्हुल्या बाळाला, वृध्द आईवडीलांना, पोटूशी बायकोला घेवून घर गाठण्याचा प्रयत्न करी होते. त्यांचे पाय सुजत होते. लहान मुले, वृध्द आजारी मानव अहोरात्र पायपीट केल्याने गलीतगात्र होवून मध्येच रस्त्यात प्राण सोडत होते. इकडे आड, तिकडे विहिर असं जगणं त्यांच्या नशीबी आल होतं. त्याची होत असलेली फारफट पहावेनाशी होती.

           तर दुसरीकडे एक वर्ग घरात सावलीत बसून दररोज वेगवेगळे पदार्थ बनवित होता आणि आजचा Special Menu, Made by me असं काही तरी नानविध आकर्षक वाक्य टाकून पदार्थ सजवून States ला ठेवत होता. आपल्या पदार्थाला किती लोकांनी Likes केलं. ते किती जणानी पाहिल, Reply काय दिला. याचं गणित करीत होता. तो सोशल मिडीयावर चोवीस तास Active रहात होता तर काहीच्या म्हणे घरात बसून – बसून त्यांच्या खालच्या पृष्ठभागाला मुंग्या येत होत्या. काहीच्या घट्टे पडत होते. तर काहीजण विनाकारण रस्त्यावर मोकाट फिरत पोलीसमित्राला त्रास देत होते. परंतु एकीकडे एक आशादायी चित्रही दिसत होते. हा वर्ग आपला वेळ सत्कारणी लावत होता. नवं काही तरी शिकत होता. जे करायचं राहून गेलं तो करण्याचा प्रयत्न करीत होता. आपले अपुर्ण राहीलेले छंद जोपासत होता. गरजूना आपल्यापरीने जमेल ती मदत करीत होता. आपलं कधी, कुठं, कायं चुकलं? याचा विचार करीत होता. या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधीत होता. तर दुसरीकडे या विषाणूच्या हल्ल्यापासून आपलं सरंक्षण करण्यासाठी आपला जीव वाचविण्यासाठी देवरूपी डॉक्टर्स, नर्स, पोलीसमित्र, सफाईगार बांधव असे सर्व घटक दिवसाचे चोवीस तास कर्तव्य बजावत होते. 

              स्वत: चा जीव धोक्यात घालून केवळ आपल्यासाठी स्वत: च्या प्राणाची आहूती देत होते. त्याच्या अहोरात्र कष्टांची, धैयाची नोंद इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिण्यासारखी होती. परंतु हा विषाणू इतका महाभयंकर होता की, त्याने मानवामध्ये कुठल्याच प्रकारचा भेदभाव केला नाही. त्याच्याकडे दयेमायेचा लवलेशही नव्हता. वाटतं होत की, तो कुठल्या जन्माचा बदला घेतोय. हो खरंच होत ते… तो एक प्रकारे मानवाचा बदलाच घेत होता. कारण मानवाची स्वार्थी तहान व भूक दिवसेंदिवस वाढतचं होती. मानव पृथ्वीची, निसर्गाची एवढचं काय? मानव मानवाचीही कत्तल करीत होता आणि म्हणूनचं मानवाचे डोळे उघडण्यासाठी हा कोरोना विषाणू पृथ्वीवर अवतरला परंतु मानव त्यालाही दाद देत नव्हता. मानवाला गर्दीची व बेभान जगण्याची इतकी सवय झाली होती की, तो याशिवाय जगूच शकत नव्हता.

            एकीकडे विषाणूच्या हा:हा: काराने मुत्यूचं थैमान सुरू असताना दुसरीकडे निसर्गामध्ये काही चांगले बदलही दिसत होते. समुद्र आपली कात टाकीत होता. मानवांन लादलेल घाणेरड रूप बदलून नदी नितळ व संथपणे वहात होती. पशू , पक्षी, प्राणी मुक्तपणे संचार करीत होती. जीवघेणा प्रदुषणाचा विळखाही सैलसर होत होता. परिसर, रस्ते, निसर्ग मोकळा श्वास घेत होता. मानवाचं वेगानं धावणं थांबल होत. काही मानव पून्हा नव्याने विचार करीत होता. जगण्याचे नवे संदर्भ शोधीत होता. 

         आयुष्यातील अनावश्यक भौतिक सुविधेसाठी व चैनीच्या हव्यासापोटी गरजेपेक्षा जास्त पैसे कमावण्यात आयूष्य खर्ची घालणं खरंच आवश्यक आहे का? याच कोडं सोडवित होता. त्यामुळे आता या विषाणूला एकचं सांगण आणि एकचं मागणं पुरे कर बाबा आता तुझं हे ताडंव. जा तू इथून .. लवकर जा. संपव एकदाचं स्वत : ला. पून्हा आमच्या आयुष्यात डोकावू नकोस. आमची चुक आम्हाला कळली. आता आम्ही आमचं जगणं अनं वागणं दोन्ही बदलून टाकू. सरळ – साधं, आनंदी आयूष्य जगू. आम्ही सारेच गुण्यागोविंदानं राहू. गरजेपेक्षा जास्त कमावण्यासाठी धाव – धाव धावणार नाही. आमच्या मुठीत, ओंजळीत आणि झोळीत बसेल एवढचं कमवू. याच निर्धाराने व निश्चयाने विषाणूच्या यूध्दात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे लढताहेत त्यांना पुर्ण सहकार्य करू. यापुढे आम्ही समुद्रासारखं अंथाग पण नदीसारखं संथ वाहू. थंड , आल्हादायक वाऱ्याच्या झुळुकीप्रमाणे आणि पशू , पक्षी, प्राणी यांच्या सोबतीने आयूष्य जगू .

 

           आपल्या पृथ्वीला, निसर्गाला अन धरणीमातेला पून्हा सुजलाम्, सुफलाम् करू. हे यूध्द आम्ही जिंकूनचं दाखवू. असे वचन देवू. प्रतिज्ञा करू . पृथ्वी हे सारं शांतपणे पहात होती. ऐकत होती. ती विचार करू लागली. खरचं हा स्वार्थी मानव स्वत : च जगणं अन वागणं बदलेल का? दिल्या वचनाला जागेल का?  सरळ – साधं आयूष्य जगणं याला जमेल का? असे अनेक न सुटनारे प्रश्न तिच्याभोवती पिंगा घालीत होते. ती स्तब्ध झाली होती. माझ्या बंधू भगिनी, मित्र, मैत्रीणीसम मानवानो, आता तुम्हीचं सांगा? काय करायचं? कसं जगायचं? कसं वागायचं? आपण स्वत: मध्ये काही बदल करायचा की नाही? मी तुमच्या उत्तराची वाट पहात आहे.

महामाया निलाबाई त्रिंबकराव कदम,

नांदेड

Related Articles

- Advertisement -

Latest Articles