पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : शहराचे पोलीस आयुक्तालय प्रेमलोक पार्क येथे आहे. पण या भागातील लोकच सुरक्षित नाहीत. या भागात अनेक भटकी कुत्री आहेत आणि त्यांची दहशत इतकी आहे कि जेष्ठ नागरिक, लहान मुलेच काय कोणीही एकटे सकाळी घराबाहेर पडू शकत नाहीत,मॉर्निंग वॉकला जाऊ शकत नाहीत किंवा काही आणायला दुकानात जाऊ शकत नाहीत. परिसरातील अनेक नागरिकांनी याच्या तक्रारी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांच्याकडे केल्या होत्या. काल स्वतः माधव पाटील यांनी एका दुचाकी चालकावर कुत्री भुंकताना पहिले. तसेच काही कुत्री त्यांच्यावर भुंकली आणि याचा अनुभव घेतला. यामुळे माधव पाटील यांनी पोलीस आयुक्त आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांना पत्र लिहून ते ट्विटरच्या माध्यमातून पाठवले.मात्र प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरले आहे,असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रवक्ते माधव पाटील यांनी केला आहे.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231118-WA0018.jpg)
माधव पाटील म्हणतात कि पोलीस आयुक्तालय असलेल्या प्रेमलोक पार्क भागातचे रस्ते या कुत्र्यांमुळे सकाळी ओसाड असतात. हि कुत्री झुंडीने माणसांवर हल्ला करतात आणि चावतातही. या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे एखाद्याचा प्राणही जाऊ शकतो. पाटील यांनी या पत्रात गुजरातमधील ‘वाघ बकरी चहा’चे मालक कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते याचाही उल्लेख करून भटक्या कुत्र्यांची समस्या किती गंभीर आहे याची जाणीव करून दिली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते असलेले माधव पाटील या सर्व प्रकारामुळे पालिकेच्या कारभारावर नाराज आहेत. ते अशी मागणी करतात कि पालिकेच्या वार्षिक ५००० कोटी बजेटमधून भटक्या कुत्र्यांसाठी १०० एकरात कुत्रालय उभारा पण आम्हाला आमच्या परिसराचा आनंद घेउ द्या. कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना घरात बसवून, महानगरपालिकने नागरिकांना गुलामाची वागवणूक देऊ नका. वारंवार तक्रारी करून यावर कारवाई शून्य. पालिकेच्या या शून्य कारवाईमुळे किंवा कारवाई केली या दिखाव्यामुळे कदाचित कुत्र्यांच्या हल्ल्यात एखाद्याचा प्राण जाऊ शकतो. तुम्ही जर पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील लोकांचे संरक्षण करणार नसाल तर काय उपयोग त्या आयुक्तालयाचा आणि पालिकेचा ? माधव पाटील यांनी या पत्राद्वारे पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना आवाहन आहे कि हि कुत्र्यांची दहशत एकदा अनुभवा आणि सकाळी ७ वाजता प्रेमलोक पार्कमध्ये रनिंग करून दाखवा नाहीतर या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा राजीनामा द्या. एकूणच पूर्ण शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या आहे पण सर्वच माजी लोकप्रतिनिधी सध्या शांत आहेत. पाटील यांनी हे ट्विट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही केले आहे.या समस्येचे निराकरण महानगरपालिका प्रशासनाने तातडीने करावे, अशी मागणी माधव पाटील यांनी केली आहे.