Wednesday, February 12, 2025

आरटीई कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या शाळांवर त्वरित कारवाई करावी – प्रकाश हगवणे

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : आरटीई कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या शाळांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते प्रकाश हगवणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केली आहे.

शहरामध्ये आरटीई अंतर्गत 172 शाळा मध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांमधील मुलांना प्रवेश दिला जातो. परंतु तब्बल 140 शाळांनी कागदपत्रांची पूर्तताच केली नसल्यामुळे त्या शाळांना शासनाचे शुल्क मिळाले नाही. यामध्ये मुद्दामहून कागदपत्रांमध्ये त्रुटी निर्माण करायची व गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे अशा प्रकारचे निश्चितच फार मोठे कट कारस्थान असू शकते अशी शंका निर्माण होत आहे, त्यामुळे ह्या संदर्भामध्ये महानगरपालिका शिक्षण अधिकारी व शाळेचा प्रशासकीय विभाग यांची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे जेणेकरून अशा मनमानी व बेशिस्त शाळा प्रशासनाला आळा बसेल.

तसेच ज्या 140 शाळांना शासनाकडून आरटीई शुल्क परतावा मिळाला नाही, त्यांच्या खात्यात शुल्क जमा झाले नाही अशा शाळांची नावे पत्रकाद्वारे जाहीर करावीत. ज्या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत जागा भरल्या गेल्या नाहीत, त्याला शाळेच्या प्रशासनाला जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळण्यासाठी अर्ज केले होते, त्या विद्यार्थ्याकडून शुल्क घेण्यात येऊ नये, अशी मागणी प्रकाश हगवणे यांनी केली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles