आयुक्त शेखर सिंह यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून चिखली येथील सुमारे ५ एकर जागेत गो संवर्धन केंद्र आणि गोशाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांबाबत महापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांनी बैठक घेतली. यावेळी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त- १ प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त- २ विजय खोराटे, मुख्य शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यात २०१४ मध्ये भाजप-शिवसेनेचे सरकारच्या काळात गोवंश हत्याबंदी कायद्याला मंजुरी मिळाली आहे. आता राज्यातील गो-संवर्धनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने गोशाळा – गो संवर्धन केंद्र सुरू करावे. त्यासाठी पुरेशी जागा आणि पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली होती.
रस्त्यावर फिरणाऱ्या गाई गुरांची देखभाल होईल
आमदार लांडगे म्हणाले की, शहराचा विस्तार वाढत असल्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या गायी, बैल आदी गोवंशाची संख्याही जास्त आहे. अनेकदा दूध न देणाऱ्या गायी अर्थात भाकड गायी शेतकऱ्यांकडून सोडून दिल्या जातात. असे गोवंश शहरातील रस्त्यांवर पहायला मिळतात.जखमी झाल्यामुळे किंवा आजारी असल्यामुळे संबंधित गोवंशाला उपाचाराची आवश्यकता असते. अनेकदा उपचाराअभावी गायींचा मृत्यूही झाल्याची उदाहरणे आहेत. तसेच, वयोवृद्ध झालेल्या गाईंची देखभाल करण्याचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून गोशाळा सुरू करण्याबाबत मागणी होत आहे. त्यासाठी गोशाळा आणि गो संर्वधन व उपचार केंद्र सुरू केल्यास गोवंश वृद्धीच्या दृष्टीने हितकारक ठरणार आहे.
प्रस्तावित गोशाळेसाठी चिखली येथील ५ एकर जागा उपलब्ध करण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे. त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या जागेकरिता १८ मीटर रस्ता नियोजित आहे. त्याचे भूसंपादन आणि तांत्रिक कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाला सूचना केली आहे. गोवंश हा आपली संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे गोसंवर्धनासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा. भाजपा, पिंपरी-चिंचवड