Thursday, April 24, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : “‘बकुळगंध’ हा अभूतपूर्व ग्रंथ!” – डॉ. पी. डी. पाटील

कवियत्री शान्ता शेळके जन्मशताब्दी ग्रंथाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन

पिंपरी चिंचवड/दि.१३- “
अपरिमित श्रमाने सिद्ध झालेला ‘बकुळगंध’ हा अभूतपूर्व ग्रंथ आहे. यानिमित्ताने शान्ताबाईंच्या कविता सर्वदूर पोहोचवून त्यांना खरोखरच न्याय देण्यात आला आहे!” असे गौरवोद्गार डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी शान्ता शेळके सभागृह, संत तुकाराम संकुल, निगडी प्राधिकरण येथे गुरुवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२३ रोजी काढले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखा आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मिती करण्यात आलेल्या ‘बकुळगंध’ या शान्ता शेळके जन्मशताब्दी ग्रंथाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन करताना डॉ. पी. डी. पाटील बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्ष डॉ. रजनी शेठ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच अक्षरवेध परिवाराचे अध्यक्ष मकरंद बापट यांच्यासह साहित्य, संस्कृती आणि समाजकारण या क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. प्रकाशनापूर्वी, मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या ‘शान्ता शेळके सभागृह’चे उद्घाटन करण्यात आले.

---Advertisement---



याप्रसंगी गिरीश प्रभुणे यांनी आपल्या मनोगतातून, “बालपणापासून शान्ताबाईं यांच्या कविता अंतर्मनात खोलवर रुजल्या आहेत. त्यामुळे ‘बकुळगंध’ हा अंतर्बाह्य देखणा ग्रंथ वाचताना शान्ताबाईं अखंडपणे सभोवती रुंजी घालत राहतात. महाराष्ट्र साहित्य परिषदेची पिंपरी – चिंचवड शाखा वर्धिष्णू व्हावी!” अशा भावना व्यक्त केल्या. प्रा. मिलिंद जोशी यांनी, “साहित्य परिषदेच्या पिंपरी – चिंचवड शाखेने स्वतःचे कार्यालय उभे करावे, ही ऐतिहासिक घटना आहे. कार्यकारिणीच्या अखंड ध्यासातून हे साध्य झाले असून त्याला दातृत्वशक्तीचा भक्कम पाठिंबा लाभला आहे. शान्ताबाई हे मराठी साहित्यातील लखलखते काव्यनक्षत्र होते!” असे मत व्यक्त करीत शान्ता शेळके यांच्या व्यक्तिगत आणि साहित्यकर्तृत्वाचा लालित्यपूर्ण आलेख मांडला. अनुराधा मराठे यांनी आपल्या मनोगतातून शान्ता शेळके यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या शीघ्रकवित्वाचा दाखला म्हणून त्यांनी केवळ दहा मिनिटांत रचलेल्या मंगलाष्टकांचे सादरीकरण केले. तसेच रसिकांच्या आग्रहास्तव “ही वाट दूर जाते…” या गीताचे सादरीकरण करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. राजन लाखे यांनी प्रास्ताविकातून ‘शान्ता शेळके सभागृह’ मिळविण्यासाठी कार्यकारिणी आणि हितचिंतक यांनी केलेल्या सहकार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली; तसेच शान्ता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सिद्ध केलेल्या ‘बकुळगंध’ या ग्रंथाची निर्मितीप्रक्रिया कथन करताना साहित्य, संगीत, नाट्य, समाजकारण, राजकारण या क्षेत्रातील सुमारे १०० मान्यवरांच्या ग्रंथातील सहभागाविषयी रंजक आठवणी कथन केल्या.

---Advertisement---


कार्यक्रमाच्या प्रारंभापासून ते समारोपापर्यंत रिचा राजन आणि डॉ. गिरीश रांगणेकर यांनी शान्ता शेळके लिखित गीतांचे सुरेल सादरीकरण करीत रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखा कार्यकारिणी आणि अक्षरवेध परिवाराने संयोजनात परिश्रम घेतले. संजय जगताप यांनी उद्घाटनसत्राचे तसेच श्रीकांत चौगुले यांनी उर्वरित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. रजनी शेठ यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles