Friday, March 14, 2025

Khed SEZ : खेड सेझ – शेतकऱ्यांना शासकीय पातळीवरून चांगला मोबदला मिळणार !

पुणे : खेड सेझ १५% टक्के परतावाधारक शेतकऱ्यांच्या वतीने एम.आय.डी.सी. प्रादेशिक अधिकारी डॉ. अर्चना पठारे वाकडेवाडी, पुणे. यांना निवेदन देऊन के.डी. एल कंपनीकडून दाखल प्रस्तावाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करून पाठपुरावा केला. Khed Sez – Farmers will get good compensation from the government level!

शेतकऱ्यांच्या प्रश्न संदर्भात मुख्यमंत्री, उद्योग मंत्री व अधिकारी सकारात्मक असून लवकरच शेतकऱ्यांना शासकीय पातळीवरून चांगला मोबदला मिळणार आहे.

खेड सेझ प्रकल्प २००८ मध्ये अस्तित्वात आला असून या प्रकल्पासाठी खेड व शिरूर तालुक्यातील कनेरसर, केंदूर, निमगाव, दावडी, गोसासी या गावातील १२५० हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले.

सेझ प्रकल्पासाठी जमीन संपादन करताना जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये बाधित शेतकऱ्यांना कायमस्वरूपी उत्पन्न मिळण्यासाठी १५% परतावा विकसित जमिनीच्या स्वरूपात ठरले होते. व त्यासाठी जमीन संपादन मूल्यातून तर विकसनापोटीची रक्कम (२५%) मोबदला देताना कपात करून घेण्यात आली.

नंतरच्या काळात यामध्ये परस्पर बदल करून खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी (के. डी .एल.) कंपनी स्थापन करून शेतकऱ्यांना या कंपनीचे भागधारक बनवण्यात आले. या कंपनीला शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून विरोध केला. गेली १४ वर्ष विविध प्रकारची आंदोलने, न्यायालयीन प्रक्रिया, मंत्री महोदय, अधिकारी, यांच्याबरोबर चर्चाबैठक व इतर मार्गांचा अवलंब करून सतत पाठपुरावा केला.

शेतकऱ्यांना अखेर न्याय देण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर वेळोवेळी शेतकरी प्रतिनिधींच्या झालेल्या बैठका तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या “सह्याद्री अतिगृहामधील” बैठकीनुसार के. डी. एल. कंपनीच्या च्या १४९ हेक्टर जमीनचे एम.आय.डी.सी. मार्फत शासकीय पातळीवरून संपादन करून शेतकऱ्यांना चांगला मोबदला देण्याचे ठरले. 

त्यानुसार एम.आय.डी.सी. कार्यालयाकडून दि.५ मे २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीकडून कंपनीच्या १४९ हेक्टर जमीन संपादना बाबतचा प्रस्ताव एम.आय.डी.सीस दिनांक २३ जून २०२३ रोजी विहित मुदतीत दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रस्तावा संदर्भात शुक्रवार दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी एम. आय.डी.सी.प्रादेशिक अधिकारी डॉ. अर्चना पठारे वाकडेवाडी , पुणे. यांची त्यांच्या कार्यालयात पूर्व नियोजित भेट घेऊन प्रस्तावा संदर्भात सविस्तर चर्चा केली. व त्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये प्रस्तावाच्या बाबतीत लवकरात लवकर कार्यवाही होऊन शासकीय पातळीवरून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळावा अशी मागणी करण्यात आली.

एम.आय.डी.सी.प्रादेशिक डॉ. अर्चना पठारे यांनी प्रस्तावाच्या अनुषंगाने सद्य:स्थिती विशद केली. प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात दाखल झाला असून “स्थळ पहाणी” झालेली आहे. पुढील प्रक्रिया “हाय पावर” कमिटीकडून लवकरच पूर्ण होईल. प्रादेशिक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने सहकार्य केले. असून त्याबद्दल त्यांचे अभिनंदनही करण्यात आले.

निवेदनासाठी शेतकरी प्रतिनिधी म्हणून प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, दादाभाऊ जैद, ओंकार कान्हुरकर, सुदामराव शिंदे, अभिजीत साकोरे, उत्तमराव कान्हुरकर, सचिन भालेकर, गुलाब हजारे, संतोष दौंडकर, काशिनाथ हजारे, निलेश म्हसाडे यांनी बहुमोल सहकार्य केले ‌‌‌‌.

शेतकरी प्रतिनिधींच्या वतीने सर्व के.डी.एल भागधारकांना विनंती करण्यात येत आहे की, शासकीय पातळीवरून लवकरच दाखल प्रस्तावाबाबत कार्यवाही होऊन शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles