नाशिक : शेतकरी विरोधी तीन कायदे व कामगार विरोधी 4 लेबर कोड मागे घेण्यात यावेत, प्रस्तावित वीज बिल रद्द करावे ,पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ मागे घ्यावी आणि अदानी अंबानी यांची उत्पादने व सेवांवर बहिष्कार टाकावा यासाठी आज भारतीय ट्रेड युनियन केंद्र सिटूच्या वतीने नाशिक शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कामगार व विद्यार्थीही या आंदोलनात सहभागी झाले होते.
अदानी,अंबानीच्या उत्पादन व सेवा वर बहिष्कार घालण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांनी जिओचे कार्ड तोडून ते बंद केले तसेच इतर सहभागी कामगार व तरुणांनी ही रिलायन्स व अदानी या उद्योग समूहाची उत्पादने व सेवांवर बहिष्कार घालण्याची प्रतिज्ञा केली .
यावेळी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी. एल. कराड, राज्य उपाध्यक्ष सिताराम ठोंबरे, माकपाचे माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सिटूचे संतोष काकडे, तुकाराम सोनजे, मोहन जाधव, कल्पनाताई शिंदे, संजय पवार, विजया टिक्कल, मुकुंद रानडे, छात्र भारतीचे समाधान बागुल, समाधान भारतीय, आत्माराम डावरे यांच्यासह शेकडो कामगार व विद्यार्थी सहभागी होते.