बीड : शहीद सुदिप्तो गुप्ता यांच्या शहादत दिनी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने बीड येथील कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
आपल्या लोकशाही अधिकारासाठी २ एप्रिल २०१३ रोजी कोलकाता येथील रस्त्यावर खुप मोठ्या संख्येने विद्यार्थी उतरले होते. SFI च्या नेतृत्वाखाली विशाल मोर्चा त्यादिवशी संपन्न झाला. पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थी निवडणुकीवरील बंदी उठवून लोकशाही पद्धतीने निवडणुका घ्या, या रास्त मागणीसाठी ते आंदोलन सुरु होते. आम्हाला संसदीय निवडणुकांमध्ये मतदान करून लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे; तर मग आमच्या कॉलेज व विद्यापीठाचे विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आम्हाला का नाकारला जातो? हा सवाल ते विद्यार्थी तेथील तृणमूल राज्य सरकारला विचारात होते.
सरकारच्या विरोधात हा प्रचंड विद्यार्थी समुदाय पाहून तेथील तृणमूल काँग्रेसचे ममता सरकार घाबरले. ते आंदोलन दाबण्यासाठी सरकारने पोलिसी दडपशाहीचा वापर करून विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला केला. त्यात SFI पश्चिम बंगाल राज्य कमिटीचे सदस्य सुदिप्तो गुप्ता हे मृत्यू पावले.
अभिवादन करतेवेळी एसएफआय चे राज्य सचिव रोहिदास जाधव, जिल्हा सचिव लहू खारगे, रवी जाधव, दत्ता सुरवसे, प्रवीण चव्हाण, गोपाल निरडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.