Wednesday, January 15, 2025
HomeNewsशेतकरी यशोगाथा : जिरेनियम : सुगंधी वनस्पती शेतीतून फुलवला संसार

शेतकरी यशोगाथा : जिरेनियम : सुगंधी वनस्पती शेतीतून फुलवला संसार

नांदेड : राज्यातील शेतकरी पारंपारिक शेतीपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारातना दिसत आहेत. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापूर येथील विठ्ठल चिंतलवार या शेतकऱ्यानं सुगंधी वनस्पती शेतीचा पर्याय स्वीकारला आहे. सुंगधी वनस्पती म्हणजेच जिरेनियम (Geranium Farming) शेतीचा पहिलाच प्रयोग त्यांनी यशस्वी करुन दाखवला आहे. जिरेनियम वनस्पतीच्या पानांपासून तेल काढून ते विविध कंपन्यांना विकून विठ्ठल चिंतलवार यांनी संसारात आणि शेतीमध्ये प्रगती साधली आहे. जिरेनियम शेतीतून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. 

जिरेनियम शेतीकडे कसे वळले

विठ्ठल चिंतलवार यांनी जिरेनियम शेतीचा एक व्हिडीओ युट्युबवर पाहिला. त्यानंतर अहमदनगरमध्ये जिरेनियम शेतीचा प्लँट पाहिला. पहिल्यांदा जिरेनियमचा प्लँट आवडल्यानं दुसऱ्यांदा माहिती घेतली आणि जिरेनियमची लागवड करण्याचा निर्णय घेतला. जिरेनियमची लागवड करण्यासाठी विठ्ठल चिंतलवार यांना लागवड,ड्रीप आणि खते यासाठी एकरी 1 लाख रुपये खर्च आला. या पिकावर फवारणी करण्याचा खर्च येत नाही. प्राणी देखील या वनस्पतीचं नुकसान करत नसल्याचं विठ्ठल चिंतलवार यांनी सांगितलेय.

उत्पन्न कसं मिळतं

विठ्ठल चिंतलवार यांना त्यांच्या शेतीतून जिरेनियम वनस्पतींच्या पानांपासून 30 ते 35 किलो तेल मिळतं. जिरेनियमच्या तेलाला एका किलोला 12 ते 14 हजार रुपये भाव मिळतो. विठ्ठल चिंतलवार यांनी जिरेनियम शेतीत पुढचं पाऊल टाकत स्वत:चा डिस्टिलेशन प्लँट उभा केला. त्यासाठी त्यांना सुरुवातीला अडीच लाख रुपये खर्च आला. त्यानंतर त्यांनी एक लाखाचा टँक खरेदी केला आहे. एकूण लागवड आणि ऑईल युनिटचा खर्च साडे चार लाख रुपयांपर्यंत आला. विठ्ठल चिंतलवार यांना जिरेनियम शेतीतून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळतं आहे. विठ्ठल चिंतलवार यांच्या शेतातील जिरेनियम शेती आणि डिस्टीलेशन प्रकल्प पाहण्यासाठी परिसारातील शेतकरी भेटी देत आहेत.

मुंबईच्या कंपन्यांशी करार

देगलूर तालुक्यातील विठ्ठल चिंतलवार यांनी जिरेनियम शेती केली आहे. या वनस्पतीच्या पानांपासून तेलाची निर्मिती करतात. मुंबई येथील कंपन्यांनी विठ्ठल चिंतलवार यांच्याशी करार केला आहे. थेट मुंबईच्या कंपन्यांशी लेखी करार केल्यामुळे उत्पन्नाचा हमखास मार्ग चिंतलवार यांना उपलब्ध झाला आहे. विठ्ठल चिंतलवार यांनी त्यांच्या शेतात डिस्टिलेशन प्लँट उभारला असून जवळपासच्या शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या जिरेनियमच्या पानांपासून तेल काढून देखील देण्याचं काम ते करतात.

जिरेनियम शेतीतून कृषी अधिकाऱ्यांना आशा

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आता नवनवीन पिकांची लागवड करत आहेत. सोयाबीन, मूग, उडीद आणि इतर पीक घेतल्यानं उत्पादनात घट होत आहे. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिरेनियम पिकाची लागवड सुरु केली आहे. प्रक्रिया केंद्र उभं करुन जिरेनियम या वनस्पतीच्या पानांपासून तेल काढलं जाते. जिरेनियमच्या तेलाला 12 ते 14 हजारांपर्यंत भाव मिळतो. एकरी 10 ते 15 किलो तेलाचं उत्पादन करता येते. साधारणता शेतकऱ्यांना दीड ते दोन लाखांपर्यंत उत्पन्न मिळतं, असं कृषी अधिकारी रमेश चलवदे यांनी सांगितले.

तेलाचं काय होत?

जिरेनियमच्या तेलाचा वापर सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर, परफ्युम तयार करण्यासाठी केला जातो. शेतकऱ्यांनी गटानं एकत्रित येऊन उत्पादन घेतलं तर शेतकऱ्यांना फायदा होतो. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञांनी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांनी कंपन्यांशी लेखी करार केला पाहिजे. कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. हा प्रकल्प जर यशस्वी झाला तर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर राबवता येईल. सुगंधी वस्तूंची मागणी पाहता जिरेनियम शेतीतून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला मार्ग उपलब्ध होऊ शकतो, असंही रमेश चलवदे म्हणाले.


संबंधित लेख

लोकप्रिय