कोल्हापूर : कोल्हापुरातील तणावाची परिस्थिती लक्षात घेता पुढचे 31 तास इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृह विभागाच्या सचिवांनी इंटरनेट बंद करायला परवानगी दिली आहे, यामुळे 8 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. कोल्हापुरमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीवर गृहखात्याने पोलिसांना आदेश दिले असून चुकीचं वागणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. तसंच कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी असंही आवाहन करण्यात आलं आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्याला महाराष्ट्रात माफी नाही.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/06/n5071743901686140106072147b8dc4b5d46f0a1887df01f36bc8744f7b87aa04b1beef1864edc774e817f7-1.jpg)
जनतेने शांतता पाळावी असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. कोल्हापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमारही केला. तसंच जिल्ह्यात 19 जूनपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार पाच किंवा त्याहून जास्त लोकांना एकत्र जमा होण्यास बंदी असणार आहे. शरद पवार यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/06/n5071743901686140088443b202d0a90c0bcf96354865389572851ed644748f157c8a45e17a725bebd21e2e-1.jpg)
गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर छ. संभाजीनगरमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे, असा सवाल शरद पवार यांनी विचारला आहे.