पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात एकेकाळी वड, पिंपळाची मोठी झाडे होती, ब्रिटिशांनी अनेक रस्त्याच्या दोन्ही बाजूला वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब इ पर्यावरण पूरक आणि ऑक्सिजन निर्माण करणारी झाडे लावून ती तोडण्यास मनाई करणारे कायदे केले होते. पिंपळ १००%, वड ८०%, कडुलिंब ७५%, चिंच ६८ % झाडे कार्बन डाय ऑक्साईड शोषतात आणि परिसर शांत आणि पर्यावरण पूरक ठेवतात.
कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्व जनतेला आणि सरकारला कळले आहे. औद्योगिक विकास, शहरीकरणाच्या चुकीच्या नियोजनामुळे शहरातील अनेक जुन्या वृक्षांना अडथळा समजून तोडुन टाकण्यात आले, त्यावेळी काही संवेदनशील लोकांनी आंदोलने केली होती. शहर हिरवे गार करण्यासाठी मनपाच्या वृक्ष सवर्धन आणि पर्यावरण खात्याने आधुनिक शोभिवंत आणि भरपूर पाणी शोषणारी झाडे लावून शहर हिरवे केले आहे, परंतु शहरातील प्रदूषण कमी झाले नाही.
गेल्या ६० वर्षात जलसंवर्धन करणारे हे वृक्ष लावू नयेत असेच सरकार धोरण आहे. ही भारतीय परंपरेतील प्राचीन झाडे पशु, पक्षी, जीवजंतूंची आश्रयस्थाने आहेत, तसेच या झाडांमुळे भूजल पातळी वाढते. मात्र अलीकडच्या काळात शोभिवंत निलगिरी सारखी झाडे रस्याच्या कडेला लावली जातात. ती झाडे पर्यावरणासाठी उपयुक्त नसतात.
इस्रायल, चीन, व्हिएतनाम सारख्या नवस्वतंत्र आणि अलीकडच्या चार दशकात विकसित झालेल्या राष्ट्रांनी शोभिवंत झाडाऐवजी भरपूर ऑक्सिजन देणारी झाडे लावली आहेत. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमासाठी हजारो हात शहरात पुढे येतात, मात्र मनपा प्रशासनाकडे पर्यावरण दृष्टिकोन नाही, कोणती झाडे लवावीत यासाठी ज्ञानवंत अधिकारी नाहीत. त्यामुळे शहरातील वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब सपाट करण्यात आली आहे असे माकपचे पिंपरी चिंचवडचे कार्यालयीन सचिव क्रांतिकुमार कडुलकर यांनी म्हटले आहे.
शहराच्या प्रत्येक प्रभागात या झाडासाठी आरक्षित जमीन करावी आणि तेथे हे प्राचीन आणि पवित्र वृक्ष लावावेत, शहरात वड, पिंपळ पार पुन्हा उभारावेत अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.