महापालिकेने करदात्यांवर लादलेला “उपयोगकर्ता कर” म्हणजे “जिझिया कराची” पुनरावृत्ती – युवक शहराध्यक्ष इम्रान शेख
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महानगरपालिकेने कचरा संकलनाच्या नावाखाली शहरातील जनतेवर लावलेला उपयोगकर्ता शुल्क रद्द करणेबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वतीने महापालिका उपआयुक्त जितेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कचरा संकलनाच्या नावाखाली शहरातील नागरिकां कडून स्वच्छता कर आकारला जात असताना देखील “उपयोगकर्ता शुल्क” या नावाने मिळकतकराच्या बिलात महिन्याला ६० रुपये प्रमाणे वर्षाला ७२० रुपये वाढ केली आहे. आणि मागील दोन वर्षाची थकबाकी म्हणून १२६० रुपये महापालिकेकडून वसूल करीत आहे. हे अन्यायकारक असून हा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा. मुळातच सदर प्रकारचा उपयोगकर्ता शुल्क महाराष्ट्रातील कोणतीही महानगरपालिका घेत नाही मग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस अशा प्रकारचा उपयोगकर्ता शुल्क घेण्याची एवढी घाई का..?
शहरातील नागरिक कर स्वरूपात लाखो रुपये कर महानगरपालिकेस भरतात, त्या मोबदल्यात महापालिकेने शहरातील नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा पुरवायचे असतात. याउलट त्या सुविधांना महापालिका उत्पन्नाचे साधन म्हणून पहात आहे आणि प्रशासक राजवटीच्या नावाखाली मनपा विविध कर व शुल्काच्या माध्यमातून शहरातील नागरिकांची लुट करीत आहे. ही लूट म्हणजे आधुनिक “जिझिया कर” असून महापालिकेच्या एक अधिकार शाही निर्णयांना राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. हा उपयोग कर्ता कर रद्द न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महापालिके प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, प्रदीप गायकवाड, निलेश शिंदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ओम क्षीरसागर, विकास कांबळे, शाहीद शेख राहील मुलानी, ओमनी गायकवाड, आसिफ पटेल व युवक पदाधिकारी उपस्थित होते.