Wednesday, February 12, 2025

चिखली घरकुलमधील पायाभूत सुविधांना ‘बुस्टर’ ; भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना सूचना

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर
: चिखली घरकुल प्रकल्पातील विविध प्रलंबित विकासकामे व प्रकल्प मार्गी लावण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. महापालिका प्रशासनाने प्रस्तावित कामे मार्गी लावावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. त्यामुळे घरकुलमधील सोयी-सुविधा सक्षमीकरणाला ‘बुस्टर’ मिळाला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना पत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत जेएनएनयुआरएम अंतर्गत चिखली से. क्र. १७ व १९ येथे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी प्रकल्प राबवण्यात आला आहे. सदर प्रकल्पामध्ये एकूण १५८ इमारतींपैकी १५३ इमारतींचे पात्र लाभार्थ्यांना वाटप केले आहे. आता चिखली घरकुल प्रकल्पातील विविध प्रकल्प् आणि विकासकमो मार्गी तात्काळ मार्गी लावणे अपेक्षीत आहे.

चिखली घरकुल प्रकल्पात प्राथमिक व माध्यमिक शाळेसाठी जागा आरक्षित आहे. घरकुल प्रकल्पातून एकूण ६ हजार ४२६ सदनिका आहेत. त्याचे लाभार्थ्यांना वाटपही झाले आहे. या परिसरात सुमारे ३० हजार लोकसंख्या आहे. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळेचे आरक्षण विकसित करणे अत्यावश्यक आहे. ज्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी गैरसोय होणार नाही.

तसेच, मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोकळ्या जागेतील १५ ते २० गुंठे जागा पोलीस स्टेशन उभारणेकामी देण्यात यावी. त्यासाठी जागा ताबा घेण्याबाबत कार्यवाही करावी, अशी सूचना आहे. त्यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबादीत ठेवण्यास मदत होईल.

घरकुलमधील टाऊनहॉल आणि लायब्ररी हे आरक्षण विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. सदरची सुविधा घरकुलमधील नागरिकांना उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी सदर काम तातडीने पूर्ण करुन भोगवाटा प्रमाणपत्र प्राप्त करुन नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली आहे.

पदपथ, रस्ते विकासाला प्राधान्य

यासह घरकुलमधील फुटपाथ व रस्ते दुरूस्तीसाठी स्थानिक नागरिकांकडून वारंवार मागणी होत आहे. सदरचे फुटपाथ हे ७ ते ८ वर्षांपूर्वी करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्यस्थितीत फुटपाथची दुरवस्था झाली आहे. नव्याने फुटपाथ विकसित करणे अत्यावश्यक आहे. तसेच, पाण्याचे पाईपलाईन, सीसीटीव्ही कॅमेरासाठी खोदाई, एच.टी. लाईनसाठी खोदाई, एमएनजीएल लाईन टाकेणेसाठी केलेली खोदाई यामुळे रस्त्यांची ठिकठिकाणी दुरावस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची दुस्ती व नव्याने विकसित करणे अत्यंत निकडीचे आहे. यासह ज्या इमारतींचे वाटप करणे प्रस्तावित आहे. त्या भागातील अंतर्गत रस्तेही विकसित करावेत, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles