आशा व गटप्रवर्तक कर्मचार्यांच्या संप प्रकरणी तिसरी बैठक निष्फळ
बेमुदत संप सुरूच राहणार !
मुंबई, दि. २२ : 15 जून 2021 पासून आशा व गटप्रवर्तक यांच्या बेमुदत संप प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात कामगार संघटनांची बैठक बोलावली होती.
या बैठकीत राज्य सरकारतर्फे आशा व गटप्रवर्तक यांना दरमहा एक हजार रुपये मानधन वाढीचा प्रस्ताव सरकार तर्फे देण्यात आला. महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने हा प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगत फेटाळला व भरीव वाढ देण्याचा आग्रह धरला.
राज्य सरकारतर्फे योग्य असा प्रस्ताव आरोग्यमंत्री यांनी न दिल्याने संप यापुढेही चालू ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.
तर आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर चर्चा करुन निर्णय घेऊ. ही तिसरी बैठक आताही राज्य सरकारने कोणताही ठोस प्रस्ताव न दिल्याने बैठक निष्फळ ठरली आहे. आशा व गटप्रवर्तकांचा राज्यव्यापी बेमुदत संप चालूच राहणार आहे.
या बैठकीस सरकारच्या वतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे, अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, डॉ. रामदास स्वामी व संघटनांच्या वतीने कृती समितीचे एम. ए. पाटील, डॉ. डी एल. कराड, भगवानराव देशमुख, राजू देसले, शुभा शमीम, शंकर पुजारी, श्रीमंत घोडके, सुवर्णा कांबळे, राजेश सिंग हे उपस्थित होते.