पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट सफारी सुरु (leopard safari) करण्याची घोषणा आज राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.राज्याचा 2023-24 या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यात ही घोषणा करण्यात आली आहे. जुन्नरच्या बिबट सफारीवरुन मागील काही दिवसांपासून वाद सुरु आहे. बिबट सफारी जुन्नरमध्ये नाही तर बारामतीत होणार अशी घोषणा अजित पवारांनी केली होती. बिबट सफारी जुन्नरमध्ये होणार की बारामतीत होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता बिबट सफारी जुन्नरमध्येच होणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं आहे.
बिबट सफारी जुन्नरमध्ये नाही तर बारामतीत होणार अशी घोषणा अजित पवारांनी केली होती. मात्र त्यानंतर जुन्नरचे राष्ट्रवादी आमदार अतुल बेनके यांनी विरोध केला होता. त्यानंतर बारामतीतील बिबट सफारीचा प्रकल्प रद्द केल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली होती. महाविकास आघाडी सत्तेत असताना अजित पवार यांनी बिबट सफारी बारामतीला उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. सुरुवातीला बिबट सफारी, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात टायगर सफारी बारामतीत करण्याचा मानस होता. यासाठी अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील गाडिखेल याठिकाणी 100 हेक्टर जागा यासाठी राखीव ठेवली होती. तसंच जवळपास 60 कोटी रुपयांची तरतूद केली होती.
अजित पवारांच्या या निर्णयाचा राष्ट्रवादीचेच आमदार अतुल बेनके यांनी विरोध केला होता. पुणे पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर जुन्नरला बिबट्या सफारीचा प्रकल्प जाहीर झाला होता. पण कालांतरांनं तो प्रकल्प बारामतीला जात असल्याचं वन खात्याकडून जाहीर करण्यात आलं आहे. मात्र या निर्णयाला बेनकेंनी विरोध केला होता आणि जुन्नरमध्ये बिबट सफारी करण्याची त्यांनी मागणी केली होती.
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन जुन्नरला बिबट सफारी होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांच्या ट्विटमुळे संभ्रमही निर्माण झाला होता. बारामती आणि जुन्नर दोन्ही ठिकाणी बिबट सफारी सुरु होणार का? असा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता. मात्र बारामती वन विभागाच्या अधिकारी शुभांगी लोणकर यांना या संदर्भात कोणतीही माहिती नव्हती. आता मात्र बिबट सफारी जुन्नरमध्येच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना धक्का; बिबट सफारी नेमका कोठे होणार ?
- Advertisement -