समाज माध्यमांवर मी एलजीबीटी समूहातील व्यक्तींना कामाची गरज आहे अशी पोस्ट केली होती संबंधित पोस्ट वेगवेगळ्या माध्यमातून अनेक व्यक्तींपर्यंत पोहोचली. सद्या 23 व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यात यशस्वी ठरलो आहोत. पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे स्वयंपाक-घरकाम, धुणी-भांडी, हाउसकीपिंग, वृद्ध व अपंग व्यक्तींची काळजी घेणे, हॉस्पिटल मध्ये रिसेप्शनिस्ट, डबे बनवणे अशी छोटी-मोठी पण हाताला रोजगार देणारे कामे आम्ही अनेक व्यक्ती व संस्था यांच्या मदतीने देऊ शकलो. चांगले शिक्षण असलेल्या व्यक्तींना सुद्धा वेगवेगळ्या कंपनीमध्ये लिपिक, सर्व्हे मॅपिंग, ऑफिस असिस्टंट, कॉलिंग सेंटर मध्ये भरती करण्यात आले.
मदतीसाठी धावून आलेल्या सर्व व्यक्तींचे आणि संस्थांचे आम्ही नेहमी ऋणी असू, सध्या ही सुरुवात असून खूप मोठा पल्ला गाठणे बाकी आहे यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तींची गरज आणि मदत आम्हाला वेळोवेळी पडणार आहे आणि हा ठाम विश्वास आहे की आम्हाला ही मदत नक्कीच मिळेल. माझ्या समलिंगी, उभयलिंगी, तृतीयपंथीयातील किन्नर आणि हिजडा समाजातील व्यक्ती (LGBTIQ) या आलेल्या संधीचं सोनं करून समाजासमोर एक नवा आदर्श आणि उदाहरण निर्माण करतील ज्यातून समता प्रस्थापित करण्याचे ध्येय साध्य होऊ शकेल.
– अनिल उकरंडे
– समलिंगी पुरुष संस्थापक ‘YUTAK’ सपोर्ट ग्रुप
तृतीयपंथीयांना रोजगाराची गरज आहे ही बातमी मी वर्तमानपत्रांमध्ये वाचली आणि ‘अनिल’शी संपर्क केला. सध्या माझ्याकडे पाच ते सहा समलिंगी आणि तृतीयपंथी व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यापुढे ही LGBT समाजातील खासकरून तृतीयपंथी व्यक्तींना मला आमच्या कंपनी मध्ये इथे काम देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
– उमेश मधुरे
– संचालक, मधूरे इन्फ्रा इंजिीअरिंग प्रा. ली.
मी पिंपळे सौदागर मध्ये स्कीन स्पेशालिस्ट डॉक्टर कडे रेसिपीशनिस्ट म्हणून काम करत आहे. माझ्या हातात काम मिळाले ज्यामुळे मी स्वाभिमानी आयुष्य जगू शकते. मी डॉ. सुभाष आणि अनिल याची आभारी आहे.
– कोमल
– हिजडा समाजातील व्यक्ती
मी ब्युटिशियन आहे आणि आता सोबत घरगुती जेवणाचे डबे देण्याचे काम सुरू केले आहे. यातून काही पैसे सुटतील ज्यामुळे गावी असणाऱ्या माझ्या आईला मी थोडी मदत करू शकते.
– रूपा टाकसाळ
– तृतीयपंथी स्त्री