असं म्हणतात की यशस्वी महापुरुषांच्या यशामध्ये त्यांच्या पत्नीचा मोठा वाटा असतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रमाबाई तथा रमाई आंबेडकर होय. आज रमाईंचा जन्मदिन. रमाईंचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी दापोली जवळील वणंद या गावी झाला.महापुरुषाची पत्नी होणे हे मोठेपणाचे असले, तरी त्यासाठी भोगाव्या लागणाऱ्या यातना, त्याग व सांभाळाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या कठीण असतात. त्या जबाबदाऱ्या, त्याग, रमाबाईंनी लीलया पार पाडल्या. त्यांच्या कुटुंबात आई-वडिलांसोबतच त्यांना तीन बहिणी व एक भाऊ होता. त्यातील मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते. रमाबाई लहान असतानाच त्यांची आई व पाठोपाठ पित्याचेही निधन झाले. त्यामुळे लहान वयातच रमाबाई यांच्या कोवळ्या मनावर मोठा आघात झाला.
यानंतर त्या आपल्या काका व गोविंदपूरकर मामा यांच्यासोबत मुंबईतील चाळीत राहायला गेले. भावंडांसोबत आपला काका व मामांसोबत राहू लागल्या. तत्कालीन समाजात त्यावेळी बालविवाह प्रथा रूढ होती. त्यामुळे त्यांचा विवाह लहानपणीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर करण्यात आला होता. रमाबाई व भीमराव आंबेडकर यांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये 4 एप्रिल 1906 रोजी झाले. लग्नाच्या वेळी भीमराव आंबेडकर 14 वर्षांचे तर, रमाबाई या 9 वर्षांच्या होत्या. लग्नानंतर वर्ष 1907 मध्ये भीमराव मॅट्रिक झाले. त्यानंतरच बाबासाहेबांचा सामाजिक व शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. साधारण वर्ष 1923 पर्यंत शिक्षण आणि चरितार्थासाठी नोकरी अशा निमित्ताने बाबासाहेब सतत बाहेर असायचे.
बाबासाहेब आपली पत्नी रमाबाईंना प्रेमाने रामू म्हणून हाक मारत असत. त्यांनी रमाबाईंना लिहायला, वाचायला शिकवले होते. बाबासाहेब विलायतेत असताना रमाबाई त्यांना स्वतः पत्र लिहीत असत व त्यांची आलेली पत्रे वाचीत असत. रमाबाई व बाबासाहेब यांना यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) व राजरत्न अशी एकूण पाच अपत्य झाली. यशवंतखेरीज इतर चार अपत्ये त्यांच्या वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दगावली. यशवंत हा एकमेव त्यांचा वंशज.
रमाईंचा संसारही संघर्षमय होता. त्यांनी आपल्या संसारिक जीवनात अत्यंत हालअपेष्टा, दु:ख, गरिबी यावर मात केली. बाबासाहेबांबरोबर संसारात आदर्श पत्नी, सून, माता या भूमिका त्यांनी पार पाडल्या. भोगलेल्या कष्टाचे व दु:खाचे कधी भांडवल केले नाही. स्वत: गवऱ्या थापून त्यांनी संसार चालविला.
डॉ. बाबासाहेब व रमाई राजगृहात राहात असताना बाबासाहेबांना अचानक विदेशात जावे लागले म्हणून रमाई काही दिवस वराळे काकांकडे राहायला गेल्या. वराळे काका लहान मुलांचे वसतिगृह चालवित होते. पण वसतिगृहाच्या आवारात मुले दिसेनात तेव्हा रमाईंनी वराळे काकांना “मुले का दिसत नाहीत’, असे विचारले.
त्यावर काका म्हणाले,”वसतिगृहाला अन्नधान्यासाठी मिळणारे अनुदान अजून मिळालेले नाही. त्यामुळे मुले तीन दिवसांपासून उपाशी आहेत.’ त्वरित रमाबाईंनी आपल्या सोन्याच्या बांगड्या वराळे काकांना दिल्या आणि म्हणाल्या, “या बांगड्या विका किंवा गहाण ठेवा, पण मुलांच्या जेवणाची त्वरित सोय करा.’ सोन्याच्या मूल्यापेक्षा त्यांच्या मनातील मुलांप्रती करुणा मौल्यवान ठरली. यावरून त्यांचे दातृत्व दिसून येते. या माऊलीचे 27 मे 1935 रोजी मुंबई येथे आजारपणामुळे निधन झाले. या माऊलीची थोरवी गाताना कवी यशवंत मनोहर म्हणतात- “रमाई मातृत्वाचे महाकाव्यच होय, जीवनाचा तो एक संपूर्ण दुःखाशय होता.’
त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर जयंती विशेष लेख
- Advertisement -