जुन्नर / शिवाजी लोखंडे : बालक, पालक आणि शिक्षकांच्या प्रश्नांकडे राज्यशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी धरणे निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती जुन्नर शिक्षक समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लांघी व आंबेगाव समितीचे अध्यक्ष ठकसेन गवारी यांनी दिली.
तसेच निवेदन प्रांतअधिकारी आणि मंचर पोलीस स्टेशनला दिल्याची माहिती आंबेगावचे सरचिटणीस राजेंद्र शेळकंदे आणि जुन्नरचे सरचिटणीस राजेश दुरगुडे यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळावा, बीपीएल मधील विद्यार्थ्यांना दैनिक भत्ता एक रुपये ऐवजी पंचवीस रुपये करावा, प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांचे मानधन सहा हजारांवरून 25000 करावे, 1 नोव्हेंबर 2005 पासून नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी, शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया विनाविलंब सुरू करावी, अशा विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस राजेश ढोबळे यांनी दिली.
यावेळी आंबेगाव समितीचे नेते सुरेश लोहकरे, जिल्हा प्रतिनिधी संतोष गवारी, आंबेगाव समितीचे माजी अध्यक्ष संतोष राक्षे, जुन्नरचे नेते नामदेव मुंढे, उपाध्यक्ष विठ्ठल जोशी, चेतन बेंढारी, जिल्हा प्रतिनिधी सखाराम वाजे, सहचिटणीस नामदेव कोकाटे, आंबेगावचे कोषाध्यक्ष अरविंद मोढवे उपस्थित होते.