संगमनेर, ता. २६ : संगमनेर तालुक्यातील कसारे येथे दलित समाजाच्या सरपंचाला काही उच्चभ्रु लोकांनी चपलांचा हार घालून सत्कार करीत अपमान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपर्वी संगमनेर तालुक्यातील कसारे येथे ग्रामपंचायत निवडणुक लागली होती, त्याठिकाणी आरक्षण जाहिर होत एससी समाजासाठी सरपंच पद जाहिर झाले, यात महेश अण्णासाहेब बोराडे यांचा चांगल्या मतांनी विजय झाला, या घटनेने काही उच्चभ्रु समाजातील लोकांचा तिळपापड झाला, या घटनेच्या रागातून सरपंच महेश बोराटे यांना चपलेचा हार घातल्याचा धक्कादायक प्रकार २६ ऑक्टोबर रोजी घडला. या प्रकरणी महेश अण्णासाहेब बोराडे (रा. कसारे, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात कृष्णाजी सुर्यभान कार्ले व मच्छिंद्र हिरामन कार्ले (रा. कसारे, ता. संगमनेर) या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अगोदरही जिल्ह्यासह राज्यात सोनई, नितीन आगे, खैरलांजी या सारख्या अनेक जातिवादाच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे अशा जातिवादाच्या घटना कधी थांबणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
दरम्यान, आरोपींनी सुद्धा सरपंचावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.