Wednesday, February 5, 2025

कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांच्या वक्तव्यावर नागरिकांनी दिलेल्या विविध प्रतिक्रिया

पिंपरी चिंचवड : अभिनेत्री कंगना राणावत यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा अपमान करणारे वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण देशभर संताप व्यक्त केला जात आहे, तसेच पुण्यातील ब्राम्हण संघाच्या कार्यक्रमात अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगना राणावतचे समर्थन केले आहे. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर केलेले हे वक्तव्य अतिशय गंभीर आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनाचा अपमान करणारे आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक, शैक्षणिक आणि कामगार चळवळीतील मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अशी वक्तव्य जाणीवपूर्वक केली जात आहेत. देशामध्ये सामाजिक दुभंगपणा कायम ठेवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. समाज माध्यमावर एसटीचा संप, शेतकरी आंदोलन, महागाई यावर होणारी चर्चा अशा विचित्र वक्तव्याने थांबते, देशातील पुरोगामी शक्ती क्षीण झाल्यामुळे स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नसलेल्या ब्रिटिश धार्जिण्या  नवहिंदुत्ववादी लोकांमार्फत अशी वक्तव्ये प्रसारित केली जात आहेत.

– डॉ.सुरेश बेरी (जेष्ठ कम्युनिस्ट नेते, आकुर्डी)

झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांच्यासह वासुदेव बळवंत फडके, लहुजी वस्ताद, अश्फाक उल्लाह खान, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू ई महान क्रांतिकारकांच्या बलिदानाचा अपमान करण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वावर चिखल फेकणाऱ्या या मनोवृत्तीचा निषेध करत आहोत. पद्मश्री पुरस्कार निवड समितीने कोणत्या निकषावर राणावत यांना पुरस्कार दिला आहे?

– प्रा.डॉ.मेघना भोसले (अर्थशास्त्र पंडित, प्राधिकरण)

संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनाचा अपमान करत आहे. विक्रम गोखले, कंगना राणावत यांनी बुरसटलेल्या विचारातून स्वतःला मुक्त करावे. वैचारिक पातळी समृद्ध करण्यासाठी १८५७ चे बंड आणि भारतीय स्वातंत्र्यच्या इतिहासाचे पारायण करावे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली इतिहास अशा वक्तव्याने पुसला जाणार नाही.

– स्वप्निल जेवळे (युवा कार्यकर्ता, तळवडे)

कंगना राणावत, विक्रम गोखले हे नवनाझी विचारांचे प्रचारक आहेत. हिटलरच्या उत्कर्षाच्या काळात अशाच प्रकारची राष्ट्रीय सभ्यतेचा अपमान करणारी वक्तव्ये जर्मनी मध्ये केली जात होती. भारतातील सध्याची विचारधारा अंधभक्तीतून केली जात आहेत.

– क्रांतिकुमार कडुलकर (श्रमिक कार्यकर्ते, चिखली)

जर २०१४ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले असे कंगना राणावत यांचे विधान आहे. तर सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, वीर सावरकर, महात्मा गांधी यांनी आयुष्यभर ब्रिटिश राजवटी विरोधात संघर्ष केला, अनेकांनी घरदारावर तुळशीपत्र ठेवले. ही लढाई खोटी होती काय? कंगना राणावत यांनी पद्मश्री पुरस्कार परत करून देशाची माफी मागावी, कारण स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांच्या बलिदानाचा हा घोर अपमान आहे. कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांचे देशद्रोही वक्तव्य मानसिक विकृतीचे लक्षण आहे.

– प्रा.डॉ.वंदना पिंपळे (वाणिज्य विभाग प्रमुख, बाबुराव घोलप महाविद्यालय)

अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती समाजाचे वैचारिक प्रबोधन करत असतात. हिंदी सिनेमातील अनेक अभिनेत्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाचा गौरव करणाऱ्या भूमिका केलेल्या आहेत. कंगना राणावत यांनी स्वातंत्र्य चळवळीतील ऐतिहासिक कामगिरीवर चिखलफेक करणारी विधाने करू नयेत. त्यामुळे तुमची वैचारिक पातळी खालच्या स्तराची आहे हे सिद्ध झालेले आहे.

– अशोक मगर (सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) 

Related Articles

- Advertisement -

Latest Articles