पुणे, ता.१५ : छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र महाराष्ट्रातील घराघरात नेणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालं आहे. ते शंभर वर्षांचे होते. आज (सोमवार) पहाटे ५ वाजल्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
काही दिवसांपूर्वी त्यांचा तोल जाऊन त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यूमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, आज पहाटे त्यांचं निधन झालं.
बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे. त्यांचा जन्म पुण्याजवळील सासवड येथे २९ जुलै १९२२ रोजी झाला होता. बाबासाहेब पुरंदरे यांचे २०१५ साला पर्यंत १२ हजारा पेक्षा जास्त व्याख्यान झाली होती. त्यांना महाराष्ट्र सरकारने त्यांना सन २०१५ मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता, तसेच २०१९ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.