जुन्नर : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील गोद्रे गावातील दोन मजुरांना बळजबरीने आळेफाटा येथुन मजुरी देण्याच्या बहाण्याने पारनेर तालुक्यातील निघोज या ठिकाणी नेण्यात आले होते. तिथे नेल्यावर त्यांच्या कडून दिवस-रात्र काम करून घेतले व त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. एका खोलीमध्ये त्यांना डांबून ठेवण्यात आले.
वीस दिवस या मजुरांकडून काम करून घेऊन त्यांचा छळ करण्यात आला. त्यांना मजुरीचे पैसे सुद्धा दिले गेले नाही हा सर्व प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी संबंधित बागायतदारावर आळेफाटा येथे गुन्हा दाखल करायला लावला. परंतु योग्य कलमे लावून ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, या मागणीसाठी आज देवराम लांडे यांच्या नेतृत्वाखाली गोद्रे गावातील ग्रामस्थ व आदिवासी भागातील सर्व मजूरांनी बनकर फाटा येथे कल्याण नगर हायवे वरती रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी अमोल लांडे, माऊली विरणक, रामा भालचिम, बाळू जोशी, लक्ष्मण दिघे, सोपान मडके, दिनेश उतळे, सुनील मेमाणे, मनोहर ससाने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पिडीत मजूरांनी मुंडन करत नवनाथ शेटे नावाच्या बागायतदाराचा तीव्र निषेध करण्यात आला असल्याची माहिती अमोल लांडे यांनी दिली.
“आदिवासी मजुरांवर अन्याय करणाऱ्या बागातदार आरोपीला दोन दिवसाच्या आत अटक करा. नाहीतर जोपर्यंत आरोपी अटक होत नाही, तोपर्यंत आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये मुक्काम करील. तसेच माझ्या गोरगरीब आदिवासी मजुरांवर यापुढे कोणताही अन्याय सहन करून घेतला जाणार नाही”, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी यावेळी दिला.