मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय पेच प्रसंगानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारने बहुमत चाचणी जिंकली. एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारच्या बाजूने एकूण १६४ आमदारांनी मतदान केले तर, महाविकास आघाडीच्या बाजूने केवळ ९९ आमदारांनी मतदान केले. हि बहुमताची चाचणी जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात भाषण केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात जोरदार भाषण केले. या भाषणावेळी शिंदे यांनी केलेल्या बंडा दरम्यानच्या अनेक गोष्टी सांगितल्या. त्यामुळे त्यांच्या या भाषणाची राज्यभरात चर्चाही झाली. त्यांच्या या भाषणावर शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला होता, उद्धव ठाकरे म्हणाले होते की, काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता. सुसाट सुटली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होते, की अपघात तर होणार नाही ना…. असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला होता. त्यावर आता शिंदे यांनी ट्वीट करत प्रत्यूत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!” असं ट्वीट केलं आहे. शिंदे यांचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.