इंद्रायणी थडी आणखी काही दिवस लांबणीवर (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – भारतीय जनता पार्टीचे नेते तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून शिवांजली सखी मंचच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा आणि महाराष्ट्रभरातील महिला भगिनींसाठी आकर्षणाचाच केंद्रबिंदू असणारा इंद्रायणी थडी महोत्सव या वर्षीही २७ फेब्रुवारी ते २ मार्च या चार दिवसांदरम्यान आयोजित करण्यात आला होता. पण, काही कारणांमुळे इंद्रायणी थडी महोत्सवाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत आयोजकांकडून अधिकृत पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. (PCMC)
अवघ्या महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या उद्योजकता विकासासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या इंद्रायणी थडी महोत्सवाची वर्षभर आपुलकीने प्रतिक्षा असते. यावर्षी विधानसभा निवडणूक आचारसंहिता, निवडणूक निकाल आणि त्यांनरच्या काळातील राजकीय-सामाजिक घडामोडी यामुळे इंद्रायणी थडीचे आयोजन करण्यास विलंब झाला, त्यातच २७ फेब्रुवारी ते २ मार्च या चार दिवसांदरम्यान आयोजित व जाहीर करण्यात आलेला हा महोत्सव आणखी काही दिवस लांबणीवर पडणार आहे.
आयोजक आमदार महेश लांडगे व शिवांजली सखी मंच च्या वतीने प्रसिद्ध कारण्यात आलेल्या पत्रकाद्वारे सांगितले आहे की, इंद्रायणी थडीची तयारी शिवांजली संखी मंच आणि सर्वच सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सुरू केली होती. स्टॉल वाटप, विविध कार्यक्रमाची रुपरेषा अगदी अंतिम टप्प्यात होती. पण, सध्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा सुरू आहेत. ज्या ठिकाणी इंद्रायणी थडी भरवण्यात येत आहे. या परिसरात 20 ते 25 मोठ्या शाळा आहेत.
या ठिकाणी परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थांना व पालकांची गैरसोय होणार आहे. वाहतूक नियोजन आणि नियंत्रण हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. याबाबत शिक्षण संस्था प्रशासनाकडून तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. राज्य सरकारने ‘कॉपीमुक्त महाराष्ट्र’ अभियान सुरू केले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभागाला अडचण होणार नाही, याची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.
PCMC Indrayani Thadi
तसेच, मोशी आणि चऱ्होली गावातील ग्रामदैवतांचा उत्सव होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांनी एकाच आठवड्यात तीन जत्रा होतील. त्यामुळे स्थानिक नागरिकांना सहभागी होता येणार नाही, असाही एक विचार पुढे आला. दरम्यान, श्रीक्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास आणि प्रखर हिंदूत्ववादी कीर्तनकार ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे अध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायातून शोक व्यक्त होत आहे. अशावेळी या महोत्सवाचे आयोजन योग्य ठरणार नाही.
प्रतिक्रिया :
देव-देश अन् धर्म आणि शेती-माती-संस्कृतीचा पुरस्कार आणि स्त्रीशक्तीचा सन्मान या संकल्पनेतून होणारा इंद्रायणी थडी महोत्सव काही दिवस पुढे ढकलण्यात येत आहे. महिला बचत गट आणि विविध उपक्रम, कार्यक्रम यांचे संयोजक यांनी नोंदणी केलेले स्टॉल व कार्यक्रम याचे नियोजन ‘जैसे थे’ राहील. नवीन वेळाप्रत्रक निश्चित झाल्यानंतर सर्वानाच याबाबत पूर्वसूचना दिली जाईल. आपण सर्वजण मिळून निश्चितपणे इंद्रायणी थडी अगदी थाटात साजरी करण्यात येणार आहे.
– मुक्ता गोसावी, समन्वयक, इंद्रायणी थडी महोत्सव.