Amravati : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा या गावात जादूटोण्याच्या संशयावरून ७७ वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेची धक्कादायक छळवणूक करण्यात आली आहे. या महिलेला बेदम मारहाण करून तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून गावभर फिरवण्यात आले. इतकेच नव्हे, तर तिच्या अंगावर गरम सळाखीचे चटके दिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
वृद्ध महिला ठरली अंधश्रद्धेचा बळी (Amravati)
३० डिसेंबर रोजी ही महिला आपल्या घरी एकटीच होती. पहाटे घराबाहेर पडल्यावर शेजारील दाम्पत्याने तिला पकडले व तिच्यावर जादूटोण्याचा आरोप केला. त्यानंतर गावातील लोकांनी तिला काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी पीडित महिलेच्या चेहऱ्याला काळं फासून, गळ्यात बूट आणि चपलांचा हार घालून धिंड काढली आहे. इतकेच नव्हे तर तिला लोखंडी साखळीचे चटके, मिरचीची धुरी दिली. यावेळी आरोपींनी पीडित महिलेला मानवी मूत्र पाजल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.
गावातील पोलीस पाटीलही सहभागी
या घटनेत गावातील पोलीस पाटीलही सहभागी असल्याचे महिलेच्या तक्रारीत नमूद आहे. इतक्या गंभीर घटनेनंतरही पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला नाही, यामुळे पीडित कुटुंबाला जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन न्याय मागावा लागला.
पीडित महिलेचा मुलगा आणि सून रोजगारासाठी गावापासून दूर राहत होते. त्यांना ४ जानेवारीला या प्रकाराची माहिती मिळाली. शुक्रवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी तक्रार दाखल केली. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
कायदा असूनही अंधश्रद्धा कायम
राज्य सरकारने २०१३ साली जादूटोणा, अघोरी प्रथा, नरबळी आणि काळी जादू विरोधात कायदा लागू केला. या कायद्यानुसार अंधश्रद्धा आणि अघोरी कृतींवर कठोर शिक्षेची तरतूद आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर अंमलबजावणी व जनजागृती आवश्यक आहे. पीडित महिलेच्या कुटुंबाने प्रशासनाकडून तातडीने न्याय देण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा :
पुणे : नारायणगाव येथे तीन वाहनांचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू, मृतांपैकी पाच जण एकाच गावातील
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू; १५,००० पदे भरली जाणार
लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्त्या कधी ? महत्वाची माहिती समोर
चाकण शिक्रापूर महामार्गावर कंटेनरने 15 वाहनांना उडवले, अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर
कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ; आठवा वेतन आयोग स्थापनेस केंद्र सरकारची मंजूरी
अमित शाह सर्वांसमोर जय शाह यांच्यावर चिडले, व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्रात २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार, ‘या’ दिवशी घोषणेची शक्यता