चांदवड (सुनिल सोनवणे) : णमोकार तीर्थ चांदवड येथील पूज्य आचार्य देवनंदि महाराज गुरूभक्त परिवार व साधु वासवानी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व गरजू अपंग लोकांसाठी मोफत कृत्रिम पाय व हात शिबीर आयोजित केले होते ते अतिशय शांततेत व नियम बद्ध नियोजित कार्यक्रम संपन्न झाला होता.
सदर कृत्रिम पाय व हात अद्यावत तंत्रज्ञानाने बनविले असून ते फायवरचे आहे, वजनास अत्यंत हलके मात्र टिकावू व मजबूत असून प्रत्यारोपण केल्यानंतर अपंग व्यक्ती चालू शकते, सायकल चालवू शकते, टेकडी सुध्दा चढू शकते तसेच सर्व दैनंदिन कामे करू शकते.
या प्रमाणे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची माहिती व अपंगत्वाचे त्या अवयवाचे मोजमाप करण्यात आले होते, यामध्ये महाराष्ट्रातुन अनेक जिल्ह्यातील नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शविली. यावेळी १ वर्षापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्व वयोगटातील पुरुष आणि स्त्री रूग्णांचे मधुमेहामुळे, गगरीनमुळे किंवा कुठल्याही प्रकारच्या अपघातामुळे हात व पाय गमावले गेले असतील अशा सर्व रुग्णांना मोफत हात – पाय बसविण्यासाठी वासवाणी मिशनचे स्वयंसेवक मिलिंद जाधव, सुशील ढगे, साहिल जैन, राहुल सरोज, ज्ञानेश्वर पाटील आदींनी यात मेहनत घेऊन ४९३ दिव्यांग रुग्णांची तुटलेले हात, पाय बसविण्यासाठी मापे घेण्यात आले होते.
यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून जी तपासणी करून मोजमापे घेण्यात आली त्यात तयार झालेले कृत्रिम पाय व हात हे त्या व्यक्तीला शनिवार २८ ऑगस्ट रोजी पाय व रविवार २९ ऑगस्ट रोजी हात सकाळी ९:३० ते सायंकाळ पर्यंत हे अवयव जोडून दिले जातील. यासाठी ओम पाटणी, पूनम संचेती, राकेश जैन, विनोद पाटणी व नितीन फंगाळ यांच्या सोबत दिलेल्या नंबर व कॉल करून संपर्क करावा असे णमोकर तीर्थक्षेत्र यांच्या कडून कळविण्यात आले.