Friday, April 19, 2024
Homeविशेष लेखमहिला विशेषजागतिक महिला दिन विशेष लेख : "ती"

जागतिक महिला दिन विशेष लेख : “ती”

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक महिला दिना विषयी बोलत असताना त्या मागची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेऊयात. 

न्यूयॉर्क मध्ये 8 मार्च 1908 रोजी हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व ‘प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा’ अशी मागणीही जोरकसपणे केली. या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन म्हणून स्विकारावा असा ‘क्लारा जेटकीन’ यांनी मांडलेला ठराव पास झाला. 

भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन हा ८ मार्च १९४३ ला साजरा झाला. विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी जागतिक महिला दिवस साजरा करताना एक विशिष्ट थीम बनवण्यात येत असते. या वर्षीची महिला दिनाची थीम ही “शाश्वत उद्यासाठी लैंगिक समानता”ही आहे.

‘लैंगिक समानता’ हा शब्द परवलीचा असला तरी वसुस्थितीत मात्र पुर्नतः समानता दिसून येत नाही. निसर्गाने जरी स्त्रि पुरुषाची शरिर रचना भिन्न केली असली तरी त्यामागे उच्च – कनिष्ठ तेचा भेद नक्कीच निर्माण केला नव्हता. हा भेद निर्माण केला आपण मानवाने. मुळात मनुष्याचे अस्तित्व टिकावे यासाठी स्त्री व पुरुष या दोघांना समानता मिळणे गरजेचे आहे. संत ज्ञानदेव देखिल त्यांच्या ओवीत म्हणतात, “स्त्री- पुरुषन्नामभेदे । शिवपण एकले नांदे !” म्हणजेच शिवशक्तींचे स्वरूप वरून जरी भिन्न दिसत असले तरी त्यांचे तत्व एकच आहेत. स्त्री पुरुष समानता यापेक्षा सोप्या व वेगळ्या शब्दात सांगता येणार नाही. अर्थात हा विचार समाजात रुजायला आणखी किती दिवस लागतील, हे सांगता येणार नाही. समानतेची सुरुवात प्रत्येकाने स्वतः पासून करायची ठरवले तर हे अशक्य देखिल नाही. 

एकविसाव्या शतकात जगत असतानाही स्त्री बद्दल समाजाचा दृष्टीकोन आजही विचार करायला भाग पाडतो. आज स्त्रीने स्वकर्तृत्वावर गगनभरारी घेतली आहे, तरी तिच्याकडे नेहमी दुय्यम नजरेतूनच पाहिले जाते. समाजात स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा देवून तिचा ठसा उमटवतेय पण यामुळे समाजाच्या भुवया लगेच का उंचावता? स्त्रीने पुरुषांप्रमाणे चार पैसे कमावले तरी घर सांभाळण्याची जबाबदारी तिच्या एकटीवरच का सोपवली जातेय? असे अनेक प्रश्न माझ्या स्त्री मनात निर्माण होतात. या वेळी आपण हे का विसरत आहोत की तिलाही जिव आहे, संवेदना आहेत, भावना आहेत, तिच्याही इच्छा, आकांक्षा आहेत. पण या सगळ्या पायंदळीच तुडवल्या जातात.

आजही बहुसंख्य स्त्रियांच्या चार भिंतीमधे राहण्याचे कारण हे फक्त पुरूषी मानसिकता आणि बुरसटलेले विचार हेच आहे. जरा कुठे ती समाजात व्यक्त होऊ लागली की लगेच तिच्याबद्दल नकारात्मक मत ठरवून मोकळे होतात, लगेच तिचा आवाज दाबला जातो अशाने तिची मात्र कुचंबण होते हे कोणाच्याही निदर्शनास येत नाही.                               

सर्रास म्हटले जाते की, ब्रम्हदेवालाही स्त्री मन ओळखता येणार नाही, परंतु मला मात्र हे निदान चुकीचे वाटते. स्त्री मन जाणुन घेण्याचा कोणी प्रयत्नच केला नाही प्रत्येक जण तिला फक्त बंधनात अडकवू पाहतो. तुमच्या असंख्य मर्यादांच्या चौकटीत स्त्रीला ठेवून तीच मन कसे ओळखता येईल तुम्हाला? तुम्ही तिचा जेवढा आदर  कराल, तिच्या भावनाची कदर कराल, तिला स्वतंत्र पणे तिचे पंख पसरून मोकळा श्वास घेऊ द्याल, तेवढी ती खुलत जाईल, व्यक्त होत जाईल.  

रूसतेय, भांडतेय अपेक्षा ठेवतेय, हक्क गाजवतेय, भरभरून बोलतेय तोवर तुमची आहे. हे सर्व संपून ती जेव्हा फक्त फसव हसेल अन व्यक्त होण टाळले तेव्हा  विश्वास बाळगा तुम्ही तिला गमावलत. सोपी असते ती समजायला, ती फक्त तुमच्या चार प्रेमाच्या शब्दांची अपेक्षा करते बाकी भरभरून मायेचा झरा वाहत  ठेवण तीला निसर्गानेच शिकवलय. तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला ठेवला तर महिला दिनाला यापेक्षा मोठी भेट तिला मिळणार नाही असे मला वाटत. 

शेवटी हे विसरून चालनार नाही की, ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरुवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. 

अशा ‘ती’ ला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

– पुजा बांगर,

MSW प्रथम वर्ष

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय