Sunday, December 8, 2024
Homeराज्यबचतगटांच्या माध्यमातून महिला अधिकारांची चळवळ अधिक सक्षम - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

बचतगटांच्या माध्यमातून महिला अधिकारांची चळवळ अधिक सक्षम – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ. महेंद्रकुमार मेश्राम लिखित ‘स्वयंसहाय्यता चळवळीतील महिलांची वाटचाल’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, दि. 26 : महाराष्ट्रात महिला अधिकारांच्या लढ्यासाठी उभ्या राहिलेल्या चळवळीने बचतगट आणि महिला अधिकारांची योग्य सांगड घातली. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे कार्य घडले, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. प्रा. डॉ. महेंद्रकुमार मेश्राम लिखित ‘स्वयंसहाय्यता चळवळीतील महिलांची वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

संविधान फाऊंडेशन आणि पुणे येथील स्वयंदीप प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’च्या शुभदा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. गडचिरोली जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या अभ्यासावर डॉ.मेश्राम यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी केलेले संशोधन आणि लिखाणाचे कौतुक करून उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, बचत गटांच्या माध्यमातून महिला आत्मनिर्भर होत आहेत ही बाब निश्चितच महत्त्वपूर्ण आहे, पण त्याचबरोबर या बचतगटांचा गैरफायदा घेऊन त्यातून महिलांची फसवणूक करण्याचे प्रकारही होत आहेत, त्याकडेही विशेषत्वाने लक्ष देणे आवश्यक आहे.  गडचिरोली जिल्ह्यातील महिला बचत गटांचा हा अभ्यास असला तरी ते संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचे संशोधन आहे.  

विशेषतः 38 ते 53 वयोगटातील महिलांचा सर्वाधिक सहभाग हा निष्कर्ष महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही लागू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे युवतींचा सहभाग वाढला तरच भविष्यात ही चळवळ अधिक सक्षमरित्या काम करेल. लोकशाहीचे मूल्य बचतगटांच्या माध्यमातून पोहोचत आहेत, मात्र लोकशाही कुटुंबांनी अंगिकारली का हेही आता तपासायला हवे. केवळ संविधानाच्या प्रती सर्वांपर्यंत पोहोचविण्याऐवजी संविधानाचा अर्थ सर्वांपर्यंत पोहोचला तरच लोकशाही अधिक सक्षम होईल.  संविधान हे आपल्या लोकशाहीचा प्राणवायू आहे, त्यामुळे नव्या माध्यमांद्वारे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविले पाहिजे. त्यासाठी लहान-लहान व्हिडीओंचा वापर करता येईल.


संबंधित लेख

लोकप्रिय