मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँगेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवार हे आता लवकरच भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. आज सकाळ पासून सातत्याने विविध घटना समोर येत आहे. अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेवरून नाशिक मधील राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी उघड अजित पवारांना पाठिंबा दिला आहे.
एकीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे नॉट रिचेबल असल्याचे वृत्त सकाळी समोर आले होते. त्यांनी आपले दोन्हीही फोन बंद ठेवले आहेत असेही सांगण्यात येत होते. मात्र धनंजय मुंडे हे मुंबईत अजित पवारांना भेटण्यासाठी आल्याचे समोर आले आहे. या सोबतच अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी संमतीच्या स्वाक्षऱ्या दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण घटनेमुळे येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या चर्चेवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे. या सर्व चर्चेत तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.