Monday, September 25, 2023
HomeCrimeकाय आहे 23 मार्चच्या शहीद दिवसाचे महत्त्व? भारतात किती व कोणाचे शहीद...

काय आहे 23 मार्चच्या शहीद दिवसाचे महत्त्व? भारतात किती व कोणाचे शहीद दिवस साजरे करतात जाणून घ्या…

भारतात वेगवेगळे दिवस हे शहीद दिवस (Shaheed Diwas) किंवा शहीद दिन (Shaheed Din) अर्थात हुतात्मा दिन म्हणून ओळखले जातात.देशात 23 मार्च हा दिवस भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी फाशी दिल्याचा दिवस म्हणून शहीद दिवस या नावाने ओळखला जातो.

लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी इंग्रज अधिकारी सॉन्डर्सची गोळ्या घालून हत्या केली. या प्रकरणी नंतर इंग्रजांनी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अटक केले. कोर्टाने तिघांना दोषी ठरवले. कोर्टाच्या निर्णयानंतर भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या जेलमध्ये फाशी दिली. या घटनेची आठवण व्हावी आणि भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करता यावे म्हणून दरवर्षी 23 मार्च या दिवशी शहीद दिवस किंवा शहीद दिन अर्थात हुतात्मा दिन पाळला जातो.

भारतात वेगवेगळे दिवस शहीद दिन म्हणून ओळखले जातात. जाणून घ्या देशातले इतर शहीद दिन….

30 जानेवारी : नथुराम गोडसेने बिर्ला हाऊस येथे 30 जानेवारी 1948 रोजी मोहनदास करमचंद गांधींवर गोळ्या झाडल्या. अतिशय जवळून 3 गोळ्या लागल्यामुळे गांधींचा मृत्यू झाला. याच कारणामुळे दरवर्षी 30 जानेवारी रोजी भारतात शहीद दिन किंवा सर्वोदय दिन (Sarvodaya day) पाळला जातो आणि गांधींना विनम्र अभिवादन केले जाते.
23 मार्च : भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी लाहोरच्या जेलमध्ये 23 मार्च 1931 रोजी फाशी दिली म्हणून भारतात 23 मार्च हा दिवस शहीद दिन या नावाने ओळखला जातो.
12 जानेवारी : मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या सोलापूरच्या चौघांना 12 जानेवारी 1931 रोजी इंग्रजांनी येरवडा जेलमध्ये फाशी दिली. याच कारणामुळे 12 जानेवारी हा दिवस सोलापूरमध्ये शहीद दिन या नावाने ओळखला जातो.
19 मे : आसामच्या बराक खोऱ्यात बंगाली नागरिक मोठ्या संख्येने होते. या नागरिकांनी राज्यात आसामी सोबतच बंगाली ही पण राज्य भाषा असावी या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. पण आसाम सरकारने आसामी ही एकच राज्याची अधिकृत भाषा असेल असे जाहीर केले. यानंतर बराक खोऱ्यात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाला. ही घटना 19 मे 1960 रोजी सिलचर रेल्वे स्टेशन येथे घडली. या घटनेची आठवण म्हणून आसाममध्ये बराक खोऱ्यात 19 मे हा दिवस शहीद दिन या नावाने ओळखला जातो.
21 ऑक्टोबर : भारत चीन सीमेवर इंडो तिबेट पोलीस दलाच्या जवानांवर चिनी सैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ देशभर पोलीस दलांकडून 21 ऑक्टोबर हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो.
17 नोव्हेंबर : लाला लजपत राय यांच्या नेतृत्वात सायमन कमिशनच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांवर इंग्रज पोलिसांनी लाठीमार केला. या कारवाईत लाला लजपत राय गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला तसेच हातापायाला जखमा झाल्या. या जखमी अवस्थेत लाला लजपत राय म्हणाले की, माझ्या शरीरावर लागलेला एक एक घाव ब्रिटिश साम्राज्याचा मृत्यूचे कारण असेल. जखमी झालेल्या लाला लजपत राय यांचा 17 नोव्हेंबर 1928 रोजी मृत्यू झाला. याच कारणामुळे 17 नोव्हेंबर हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो.
19 नोव्हेंबर : झाशी संस्थानच्या प्रमुख राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1935 रोजी झाला. इंग्रजांविरुद्ध लढताना 1857च्या उठावात त्यांनी बलिदान दिले. राणीला तसेच 1857च्या उठावात बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ दरवर्षी 19 नोव्हेंबर हा दिवस शहीद दिन अर्थात हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.
24 नोव्हेंबर : मुघल बादशहा औरंगजेब याने शिखांचे नववे गुरू ‘गुरू तेग बहादूर’ यांना अटक केली आणि इस्लाम धर्माचा स्वीकार करण्यास सांगितले. ‘गुरू तेग बहादूर’ यांनी नकार दिला. यानंतर औरंगजेबाने ‘गुरू तेग बहादूर’ यांचा शिरच्छेद केला. ही घटना ज्या दिवशी घडली तो 24 नोव्हेंबर हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो.

संबंधित लेख

 


लोकप्रिय