भोर : कोट्यवधी देशवासियांनी रक्त सांडून स्वातंत्र्य मिळवले आहे. त्यामुळे अभिनेत्री कंगना राणावत यांचे २०१४ साली देश स्वतंत्र झाला हे विधान देशद्रोही आहे. याचा सुजाण नागरिकांनी निषेध केला पाहिजे. आपल्या देशात समृद्ध लोकशाहीचा वारसा आहे. येथे सुलतानी, हुकूमशाही राजवटी नाहीत. पाकिस्तान भारत एकाच वेळी स्वतंत्र झाले. मात्र तेथे लोकशाही नसल्यामुळे चहाची टपरी सुद्धा हुकूमशहाच्या ताब्यात असते. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दल तुच्छ विधान करणाऱ्या लोकामागे एक कोणती विचारसरणी आहे, याचा तपास केला पाहिजे, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यीक विचारवंत हरी नरके यांनी भोर येथे केले.
फुले शाहू आंबेडकर विचारप्रसारक मंडळ आणि इतर संस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या सातव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, प्राचीन भारताच्या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये दलित, आदिवासी, मागास, अल्पसंख्याक, महिला याना शिक्षणासाठी स्थान नव्हते. मग ती शिक्षण पद्धती आदर्श कशी ठरेल? भारतीय राज्यघटनेने सर्वांना समानसंधीचे हक्क दिलेले आहेत. इथे जातीचे लेबल लावून संधी नाकारता येत नाही.
या संमेलनाचे उदघाटन लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर यांचे हस्ते झाले. तृतीय पंथी सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत याना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव पुरस्कार, कल्पना रोकडे आदर्श शिक्षक पुरस्कार, शंकरराव जगताप कार्यगौरव, यु पी एस सी टॉपर विनय साळवे, बार्टीच्या सुनंदा गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम थोपटे, साहित्यिक उत्तम कांबळे, ब्रिगेडियर आर के गायकवाड, रोहिदास जाधव, ज्ञानोबा घोणे, प्रसन्नकुमार देशमुख, निवृत्त कर्नल सुभाष पोळ इ मान्यवर उपस्थित होते.