जुन्नर : माणकेश्वर ता.जुन्नर येथे कृषी विभागाच्या माध्यमातून गावातील पाणी संवर्धन करण्यासाठी वनराई बंधारा तयार करण्यात आला आहे.
वनराई बंधारा हा बंधाऱ्याच्या बांधकामाचा एक कच्चा प्रकार आहे. हा बहुदा तात्पुरता असतो. याचे बांधकाम सिमेंटची रिकामी पोती, माती, वाळू व दगड यांच्या सहाय्याने करता येते. हा बंधारा वनराई संवर्धनाचे काम करतो म्हणून यास वनराई बंधारा म्हणतात.
याद्वारे, पावसाळा संपल्यानंतर, नाला किंवा ओढा यातील पाणी-प्रवाह स्थानिकरित्या मिळणाऱ्या वस्तूंनी अडवून, बिगर-पावसाळी शेतीच्या हंगामासाठी पाण्याची तजविज छोट्या प्रमाणात करता येते व काही प्रमाणात भागविताही येते. अशा प्रकारच्या बंधाऱ्यांची साखळी करून जमिनीत मुरवता येते. त्याने पाण्याच्या भूगर्भपातळीत वाढ होते. हा एक सक्षम जलस्रोत आहे.या बांधाऱ्यामुळे गुरे, जनावरे, पशू, पक्षी ह्यासाठी पिण्याचे पाण्याचे तसेच शेतीसाठीउपयुक्त स्त्रोत ची सोय होणार आहे.
स्थानिक शेतकरी रामचंद्र कोरडे, धर्मा कोरडे, बाळू जाणकू कोरडे, कोंडीभाऊ बांबळे, एकनाथ मुंढे, दत्तात्रय लांडे, पांडुरंग बांबळे, किसन शेळकंदे, बाळू उतळे, बाळू कोंडीभाऊ कोरडे यांनी हा बंधारा तयार केला आहे. जुन्नर तालुका कृषी कार्यालय, अधिकारी व कर्मचारी तसेच भारती मडके, अमोल भालेकर यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.