मुंबई / प्रमोद पानसरे : सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा येत्या 12 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून आजपासून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. परिणामी येत्या 12 तासात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 24 तासात हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ओडिशा किनाऱ्याच्या दिशेने सरकणार आहे.
हेही वाचा ! राज्यातील थिएटर्स २२ ऑक्टोबरपासून उघडणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
याचा परिणाम म्हणून पुढील चार ते पाच दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
विशेषत: रविवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसेच मुंबईसहित कोकणातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
ब्रेकींग : सोयाबीन दरात मोठी घसरण, 27 सप्टेंबर रोजी किसान सभेची आंदोलनाची घोषणा