Tuesday, September 17, 2024
Homeराज्यरायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

अलिबाग, दि.६ : रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महामहिम राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार सुनील तटकरे उपस्थित होते.

राष्ट्रपती कोविंद आपल्या भाषणात म्हणाले की, रायगड किल्ल्याला भेट देणे, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. या रायगड भेटीला आपण एक प्रकारची तीर्थयात्राच मानतो. या भेटीसाठी निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांचे विशेष आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेले हिंदवी स्वराज्य हे सर्व जगाला प्रेरित करणारे होते.

राष्ट्रपती महोदयांनी आपल्या भाषणात गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक एकता, सांस्कृतिक गौरव व देशप्रेम वाढीच्या परंपरेची सुरुवात केल्याचा विशेष उल्लेख केला. राष्ट्रपती कोविंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध कार्यकुशल वैशिष्ट्यांबद्दल आपल्या भाषणातून आदर व्यक्त केला.

भारतातील युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची ओळख होण्यासाठी “शिवराजविजया” या संस्कृत भाषेतील पुस्तकाचा भारतीय इतर भाषांमधून अनुवाद व्हावा, अशी अपेक्षा यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपती कोविंद हे “रोप वे” ने रायगड किल्ल्यावर आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी व मुलीसह होळीच्या माळावरील शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. याशिवाय त्यांनी राजसदर येथील सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचेही दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली.

राजसदर येथील आयोजित स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजी राजे यांनी राष्ट्रपती महोदय व त्यांच्या कुटुंबियांना दांडपट्टा, होन, महाराजांच्या आज्ञापत्राची प्रतिकृती या भेटवस्तू दिल्या. 

संबंधित लेख

लोकप्रिय