Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Scheme : बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजना

बांधकाम कामगारांची नित्य आरोग्य तपासणी होण्याच्या दृष्टीने विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा या राज्यस्तरीय योजनेची माहिती देणारा लेख… Vishwakarma Construction Worker Health Care Scheme

---Advertisement---

बहुतेक बांधकाम कामगार हे निरोगी आणि सुरक्षित कार्यपद्धतीबद्दल जागृत पूर्णपणे जागरूक नसतात, त्यांना कार्य-संबंधित जोखीम व इतर विविध भौतिक, रासायनिक, जैविक जोखीम आणि मानसिक-सामाजिक घटक अशा विविध गोष्टींचा सामना करावा लागतो. त्याकारणाने अनेक बांधकाम कामगार हे त्रस्त आहेत. त्यांना अनेक विकारांचा सामना करावा लागतो, जसे की मस्क्यूकोस्केलेटल विकार, कमी ऐकू येणे, हातात कंपन जाणवणे, त्वचा आणि श्वसन रोग इत्यादी. या सर्वांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांनी नित्य नियमाने आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. असे केल्यास त्यांना अशा प्रकारच्या विविध आजारापासून दूर राहता येईल किंवा अशा प्रकारचे काही जुनाट आजार असल्यास त्यावर त्वरित उपचार करता येतील व त्यांचे स्वास्थ चांगले राहील. त्यांची कार्यक्षमता वाढेल व त्यांना त्यांची रोजगार क्षमता वाढण्यास मदत होईल. एकंदरीत त्यांना सुरक्षित, निरोगी आणि समृद्ध जीवन जगता येईल.

बांधकाम व्यवसायामधील कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने त्यांची नियमित आरोग्य तपासणी व्हावी व त्यांना त्वरित उपचार मिळावेत, याकरिता महाराष्ट्र शासनाकडून ही योजना राबविण्यात येत आहे. त्यांच्या आरोग्याच्या वेळोवेळी तपासण्या झाल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर प्राथमिक स्तरावर उपचार करणे शक्य होणार आहे.  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदित सक्रिय (जीवित) बांधकाम कामगार यांच्याकरिता ही योजना असून, याअंतर्गत तपासणी ते उपचार अशी सेवा प्रदान करण्यात येणार आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी, रोगाचे त्वरित निदान, वैद्यकीय उपचारांसाठी सुलभ प्रवेश, कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढवण्यास मदत, आरोग्य सेवा आपल्या दारी असे या योजनेचे प्रमुख फायदे आहेत.

---Advertisement---

योजनेचे लाभार्थी

या योजनेअंतर्गत सर्व नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगार तसेच, त्यांच्या कुटुंबामधील पती अथवा पत्नी व १० वर्षावरील प्रथम दोन अपत्ये ही लाभार्थी म्हणून गणण्यात येतील. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांच्या सक्रिय (जिवित) नोंदणी कालावधीमध्ये वर्षातून एकदा या योजनेच्या लाभासाठी लाभार्थी पात्र राहील. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक २८ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार नोंदीत सक्रिय (जिवित) बांधकाम कामगार अथवा त्याच्या कुटुंबातील पात्र व्यक्तींनी आरोग्य योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांना शासकीय योजनेची द्विरुक्ती टाळण्यासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र, त्या बांधकाम कामगाराचा अथवा कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांच्या उपचारावरील खर्च 5 लाख रूपयापेक्षा अधिक होणार असल्यास या योजनेच्या खर्चाच्या मर्यादेत नियुक्त संस्थेने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सहमतीने सूचीबद्ध केलेल्या रुग्णालयांमार्फत उपचाराकरीता लाभार्थी पात्र राहील. ही योजना मंडळाकडे नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांकरीता ऐच्छिक स्वरूपाची राहील.

ही योजना प्राथमिक आरोग्य तपासणी चाचणी, प्रगत पुष्ठीकरण आरोग्य तपासणी चाचणी व वैद्यकीय उपचार या तीन टप्प्यामध्ये राबविण्यात येईल.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगार यांच्याकरीता “तपासणी ते उपचार आरोग्य योजना” राबविण्याकरीता एच.एल. एल. लाईफकेअर. लि. (भारत सरकार उद्योग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अपघातप्रकरणी वैद्यकीय सहाय्य

बांधकामाच्या ठिकाणी नोंदित सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारास अपघात झाल्यास ती व्यक्ती या योजनेंतर्गत उपचारास पात्र राहील. बांधकाम कामगारास आवश्यकतेनुसार व सोईनुसार ज्या रूग्णालयामध्ये उपचाराकरीता भरती केले असेल, असे रूग्णालय खाजगी असल्यास तात्पुरत्या स्वरूपात सूचीबद्ध करून पुढील उपचार नियुक्त संस्था करेल. अपघातानंतर उपचाराकरीता असलेल्या रुग्णालयांची माहिती लाभार्थी / कामाची आस्थापना / नातेवाईक / इतर व्यक्तींनी नियुक्त संस्थेस टोल फ्री क्रमांकावर अथवा जिल्हा / तालुका कामगार सुविधा केंद्रास देणे आवश्यक राहील.

सूचीबद्ध रुग्णालये

नियुक्त संस्थेने प्रत्येक तालुक्यात किमान एक याप्रमाणे निश्चित ठिकाणी कायमस्वरूपी आरोग्य तपासणी केंद्रे निर्माण किंवा सूचीबध्द केलेल्या ठिकाणी लाभार्थी भेट देवून प्राथमिक आरोग्य तपासणी करू शकेल व तपासणी अहवाल (प्राथमिक व प्रगत पुष्ठीकरण) मिळवू शकेल. पृष्ठीकरण आरोग्य तपासणी चाचणी तसेच, वैद्यकीय उपचाराकरीता नियुक्त संस्था रूग्णालये सूचीबध्द करतील. प्रत्येक जिल्हा कामगार सुविधा केंद्राच्या क्षेत्रामध्ये किमान तीन रूग्णालये मंडळाच्या मान्यतेने सूचीबध्द  करून आवश्यकतेनुसार यामध्ये वाढ करण्यात येईल.

फिरते वैद्यकीय कक्ष

फिरते वैद्यकीय कक्ष नियुक्त संस्थेमार्फत प्रत्येक जिल्हा कामगार सुविधा केंद्राच्या क्षेत्रामध्ये 24 X 7 कार्यरत राहील. या कक्षावरील होणारा खर्च नियुक्त संस्थेमार्फत करण्यात येईल. नियुक्त संस्थेमार्फत फिरते वैद्यकीय कक्ष वाहन विनाशुल्क उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. या फिरते वैद्यकीय कक्ष वाहनामध्ये डॉक्टर, परिचारक व मदतनीस उपलब्ध राहतील. हे फिरते वैद्यकीय कक्ष वाहन अत्याधुनिक जीवन समर्थन प्रणालीयुक्त असून यामध्ये लाभार्थ्यांना द्यावयाची औषधे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागणारी अत्यावश्यक औषधे, प्रथमोपचार इ. सुविधा देण्यात येतील. हे फिरते वैद्यकीय कक्ष वाहन हे या योजनेकरीता तयार केलेल्या समर्पित बांधकाम कामगार आरोग्य क्रमांकाशी संलग्न राहील.

या योजनेचा निःशुल्क टोल फ्री क्रमांक १८००-२-६६ ६६ ६६ ६६  हा असून यावर कामगारांना संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाशी  संपर्क साधावा.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles