Saturday, March 29, 2025
---Advertisement---
---Advertisement---

विंटेज आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास आजपासून सुरु, जाणून घ्या ‘विंटेज’च्या कलाकृती

---Advertisement---

मदर्स लघुुुपटातील दृश्य

---Advertisement---

विंटेज आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ एरवी कोल्हापुरात प्रत्यक्षात होतो, यंदाची ३री आवृत्ती मात्र २५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान कोरोना पार्श्वभूमीवर ऑनलाइन असेल. त्यामुळे आता केवळ कोल्हापूरातीलच नव्हे तर जगभरातील रसिक याचा लाभ घेऊ शकतील. या निमित्ताने कोल्हापुरातील काही लघुपटही जगभरात पोचतील. प्रतिवर्षी लघुपट संख्येत आणि सहभागी देशांच्या संख्येतही होणारी वाढ आश्वासक आहे. माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन यांसाठी विशेष माध्यमपीठ असणारा हा महोत्सव पुढे पूर्ण लांबीच्या चित्रपटांपर्यंत नेण्याचाही आयोजक सचिन भोईराजे आणि चेतन पडोळे यांचा मानस आहे. सायकल बोधचिन्ह असणाऱ्या या महोत्सवात अगदी पहिल्या वर्षीपासून मी सिलेक्शन आणि फायनल ज्युरी म्हणून जबाबदारी वाहतोय. यंदा देशविदेशातील २३७ लघुपट आले होते. त्यापैकी ऑफिशियल सिलेक्शन म्हणून ११५ इतके लघुपट निवडण्यात आले आहेत. अंतिम ज्युरी म्हणून माझ्यासोबत ‘भाँ’ या वेधक मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि रंगकर्मी संदीप दंडवते (अहमदनगर) आहेत. त्यानिमित्ताने…

वैश्विक लघुपटांतील आईची रूपे … 

‘मदर्स’ (जर्मनी) या अनेकवचनी शीर्षकातून जगातील सर्वच निर्वासित आयांच्या आपल्या मुलांपासून ताटातुटीची वेदना अधोरेखित केली आहे. मायदेशातून पलायन करत असताना पोटचे मुल तेथेच ठेवावे लागलेली एक निर्वासित अरेबिक आई, आता त्या मुलासही आश्रित देशात आणण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे आटापिटा करते आहे. याबाबत काहीही मदत करणे शक्य नाही, हे वारंवार सांगूनदेखील ती ऐकण्यास तयार नाही. ती तिच्या पर्समधील मुलाचा फोटो अधिकाऱ्यास  दाखवू लागते, तेव्हा वैतागलेला अधिकारी- ‘मग हा विचार पलायन करण्यापूर्वीच करायचा होता’, असे सांगत तिला अक्षरशः हाकलून लावतो. हा अस्वस्थ अधिकारी घरी येतो तेव्हा त्याची वृद्ध आई खुर्चीत कुठल्यातरी तंद्रीत हरवलेली दिसते. तो तिची मायेने विचारपूस करतो. ती भिंतीवरच्या फोटोकडे नजर टाकते. आपण फ्लॅशबॅक मध्ये जातो. आता याही आईबरोबर पूर्वार्धातील प्रसंगाची पुनरावृत्ती घडताना दिसते. ही देखील तिच्या पर्समधील मुलाचा फोटो अधिकाऱ्यास  दाखवू लागते, तेव्हा वैतागलेला अधिकारी- ‘मग हा विचार पलायन करण्यापूर्वीच करायचा होता’, असे सांगत तिला अक्षरशः हाकलून लावतो. त्या दृश्यात कार्यालयाबाहेर पडणारी मात्र अरेबिक आई दाखवली आहे.

‘अमलगामा / लूम’ (कोलंबिया) मध्ये यादवीत हेन्रीकडून अल्सीराचा मुलगा मारला गेलाय. शेतावर एकटीने राबणाऱ्या अल्सीरास मदत करण्यासाठी हेन्री येऊ लागतो. ती  सुरवातीस निरीच्छेने त्याकडे पाहते, नंतर उदासीनतेने त्यास कामे सांगू लागते. आणि शेवटी त्यास माफ केल्याचा संकेत देते. यादवी, युद्ध, दंगली यांची अटळताच अशी की कदाचित अल्सीराच्या मुलाकडूनही हेन्री मारला जाऊ शकला असता. अशावेळी मानवतेच्या दृष्टीने भूतकाळ उगाळत बसण्यापेक्षा क्षमा करणेच महत्वाचे नाही का! आपल्याकडे सूडपटांची एक दीर्घ परंपराच आहे, पण क्षमापटांची मात्र नाही! ती निर्माण होण्यासाठी मानवीय सामंजस्य वाढणे महत्वाचे आहे.

अमलगामा लघुपटांतील दृश्य

‘रिया’ (जर्मनी) मध्ये मातृत्वाची जबाबदारी न स्वीकारु शकणाऱ्या शीर्षकी व्यक्तिरेखेची गोष्ट येते. मात्र मुख्य कथानकाचा फोकस हा कौटुंबिक हिंसाचाराचे एक गडद परिमाण दाखविणारे आहे. तर ‘फ्रेया’ (अमेरिका) मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियंत्रणात गेलेल्या मानवी आयुष्याची गोची दाखवत असताना त्यातील नायिकेला वन नाइट स्टॅन्डमुळे दिवस गेल्याचे कळल्यानंतर उडालेली त्रेधा दाखविण्याचा प्रयत्न आहे. तर ‘कदाचित’ (भारत / सुरज शेलार) मध्ये समाजव्यवस्थेत मातृत्वासाठीचे स्त्रीवर असणारे दडपण हा आशय अतिशय तरल संवेदनशीलतेने हाताळलाय.   

‘प्रश्न’ (संतोष राम) मध्ये अल्पशिक्षित श्रमिक आईची मुलाने शिकावे, यासाठी चाललेली धडपड अतिशय संयतपणे मात्र ठामपणे येते. यात क्षमता असूनही मुलींच्या शिक्षणात येणारा अडथळा, हा धागाही अगदी अलगदपणे गुंफलाय. नववास्तववादी शैलीतून ऊसतोड कामगारांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न उपस्थित करत, त्याच्या उत्तराची एक शक्यताही मांडून आश्वस्त करू पाहणारा डोळस प्रयत्न आहे. 

‘कुरडई’ (अभिषेक लागस) मध्ये आई मुलाच्या भावबंधाची कथा अगदी त्या नात्यातील मिठास असते, तशी उलगडते. दिग्दर्शकाने आपल्या बहीण आणि भाचा यांनाच यात घेतलय. प्रत्यक्ष आईमुलानेच या व्यक्तिरेखा साकारल्या असल्याने त्यांच्यातील केमिस्ट्री घरातून थेट स्क्रीनवर उतरते. ‘प्रश्न’मध्येही मुख्य कथानकातील आई व मुलगा (जाधव) तसेच उपकथानकातील बाप व मुलगी (राठोड) हे प्रत्यक्षातही त्याच नात्यातील आहेत, ही जाताजाता सहज नोंद.  

---Advertisement---

काही वेधक माहितीपट

‘पोर्ट्रेट्स ऑफ माय मदर’ (मेक्सिको) यातील श्रमिक आईस कामावर जाताना आपल्या लहान मुलीस घरीच सोडून जाणे, क्रमप्राप्त असते. तिच्या या लहान मुलीचे त्यांच्या राहत्या परिसरातच लैंगिक शोषण झाले. या घटनेने ही श्रमिक आई हादरली. त्यास ती स्वतःस जबाबदार मानू लागली, एवढेच नव्हे तर ती तिच्यावरही लहानपणी झालेला बलात्काराची आठवण सांगते, तिनेही कामावर बाहेर जाणाऱ्या आपल्या आईस जबाबदार धरलेले असते. आता तिला तिच्या आईची वेदनाही जाणवते आणि कदाचित तिच्याही लहानपणी तिलाही अशाच घटनेस सामोरे जावे लागले असेल, अशी परंपरा शक्यता आपल्यासमोर प्रस्तुत करते. ज्या पद्धतीच्या समाजव्यवस्थेत आपण जगत आहोत, त्याची बोचरी जाणीव करून देणारा हा माहितीपट आहे.

फ्रॅम लघुपटातील दृश्य

फ्रॅम  / फॉरवर्ड’ (फिनलंड) – थॉमस फ्रेऊंडलीच आणि वाल्टेरी रिक्लिओ हे नृत्यपटनिर्मितीकडे वळलेले मुळात नर्तक कलाकार होत. ‘फ्रॅम’मध्ये तर ते नवनवीन भूभाग शोधून काढण्यासाठी झालेल्या शोधमोहिमांपैकी एका मोहिमेच्या मार्गावर निघतात. जेथे कोणीच गेले नाही, अशा ठिकाणी जाण्याचे माणसाला वेध का लागतात? या प्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न या अभिव्यक्तीमय नृत्याची जोड असणाऱ्या माहितीपटातून घडते. अशा भूभागांकडे पाहण्याचा वासाहतिक दृष्टिकोन यावरही अंतर्मुख करणारा कटाक्ष यात टाकला आहे. उदा. १) ध्रुवीय अस्वलाच्या अधिवासात जाताना आपणच स्वसंरक्षणासाठी बंदूक न्यायची वगैरे. २) जणू काही हे भूभाग शोधून काढण्यापूर्वी ते अस्तित्वातच नव्हते! त्या काळात जेव्हा या मोहिमा व्हायच्या, तेव्हा त्यांची तुलना  आजच्या काळातील अवकाश मोहिमांशीच करावी लागेल. खरेतर आता या प्रदेशांत वावरताना पर्यटकांनी काहीच कचरा, वस्तू मागे सोडू नये, असा कायदा आहे. पण ही माहिती येताना आपणास या भागांत बंद पडलेल्या खाणींच्या साइट्सवर मानवीय हस्तक्षेपाचे अवशेष दिसतात, आणि याबाबद्दलचे चिंतायुक्त भाष्यही येते. 

‘सिन्स वुई आर हिअर’ (जर्मनी) – मर्सिडेझ अझपिलीस्युएटा ही कवी प्रकृतीची दृश्य माध्यमांत काम करणारी कलाकार आहे. जॅको वॅन उडेन हा एक  उद्योगविषयक संशोधक प्राध्यापक आहे. मर्सिडेझ आणि जॅको हे एका महिन्यासाठी परस्परांच्या कामाची अदलाबदल करतात आणि एकमेकांच्या कार्यालयातून ते काम करताना त्यांच्या जाणिवेतून घडणारे दर्शन अशी ही या माहितीपटाची संकल्पना आहे. सरावाच्या नसलेल्या अवकाशात आणि कार्यपद्धतीत काम करताना त्यांच्या मनातील रिफ्लेक्शन्स निवेदनातून उलगडत जाते. मर्सिडेझ, जॅको आणि सेलिन बर्गर या तिघांनी मिळून हा माहितीपट म्हणण्यापेक्षा जाणीवपट बनवला आहे. सेलिनदेखील दृश्य माध्यम कलाकार आहे. भूमिकांमधील स्विचओव्हर ही एरवी फिक्शनपटांमधून परिचित संकल्पना, या माहितीपटासाठी अतिशय गांभीर्याने वापरली आहे. 

‘व्हेन यु ग्रो अप’ (नेदरलँड) या मॅक्स बगरमन दिग्दर्शित माहितीपटाच्या सुरवातीस आणि शेवटास एक निवांत पहुडलेले बाळ दिसते. आणि दरम्यान लॉंग शॉट्समधून दिसत राहतात ती आठवड्यातील कोणत्याही कामाच्या दिवशी व्यस्त लोकांचा दिनक्रम. समाजरहाटं सुरु राहण्यासाठी त्यास जुंपून घेतलेल्या माणसांची अवस्था अतिशय प्रत्ययकारकतेने येथे येते. ‘शेकींग अ सिंगापूर स्पिअर’ (सिंगापूर) या लाइव्ह कम ॲनिमेटेड माहितीपटातून शेक्सपिअरच्या साहित्याचा अगदी आजच्या सिंगापूरमध्ये असणारा प्रभाव सचेत करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः यातील तरुण पिढीच्या मुलाखती ज्या खुमासदार पद्धतीने संकलित केल्या आहेत, त्यातून रंगतही वाढते आणि तरुण पिढीचे विविध दृष्टिकोनही समोर येतात.       

स्फुमॅटो (इराण) या माहितीपटात स्त्रियांनी मोटरसायकल चालविण्यास प्रतिबंध असणाऱ्या देशात ती चालविणाऱ्या तरुणीची कथा येते. अर्थात तिला तिच्या शेतकरी बापाची जरी साथ असली तरी काकांपासून ते पोलिसांपर्यंत अनेकांचा विरोध आहे. मोटरसायकल चालविता येत असल्यामुळे ती बापास अडचणीच्या प्रसंगी मदतही करू शकतीये. विशेष म्हणजे तिच्या आजीलाही स्त्रियांवरची असली बंधने मान्य नाहीत. पूर्वी इराणमध्ये असे नव्हते, असे जेव्हा ती आजी म्हणते, तेव्हा धर्माधारित राष्ट्रांमध्ये स्त्रियांच्या अधिकारांच्या होणाऱ्या गळचेपीविरोधातील हे राजकीय भाष्यच आहे.

लॉकडाऊन काळास सर्जनशील प्रतिसाद लॉकडाऊनपट – 

इटलीमध्ये गेली कित्येक वर्षांची गुडफ्रायडे ते ईस्टर दरम्यान निघणारी मिरवणूक यंदा मात्र लॉकडाऊन पार्श्वभूमीवर होऊ शकली नाही. त्या पार्श्वभूमीवर ‘द मिस्ड प्रोसेशन’ ( इटली ) या माहितीपटामध्ये ती धार्मिक पोकळी चित्रित करण्याचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने सामाजिक, सांस्कृतिक भाष्यही आहे. अर्थात हे सर्व संयतपणे घडते. यात परंपरा खंडित झाल्याची सहज वेदना असली तरी भावनिक मुद्दा बनवण्यासाठीचा आक्रोश बिलकुल नाही. परंपरा पुढे नेताना त्यात कालौघात गरजेचे असणारे बदल आत्मसात करण्याची भूमिकाही सकारात्मक आहे. 

दुर्गाज लॉकडाऊन पटातील दृश्य

‘दुर्गाज लॉकडाऊन’ (मितेश ताके / संवादविरहित) यांनी कौटुंबिक हिंसाचार हा विषय अगदी सूचक पद्धतीने मांडलाय. व्यक्तिरेखांचे चेहरे न दाखवता, नवरा व बायको यांची दिनचर्या जक्स्टापोझ करत त्या पार्श्वभूमीवर धक्कादायक क्लायमॅक्स येतो. प्रत्येक फ्रेमचा सखोल विचार, प्रतिकात्मकताही दाद देण्याजोगी झाली आहे. मितेशसह त्याच्या बायकोनेच (वनिता) व्यक्तिरेखा साकारल्यात तर मुलाने (सृजन) सहछायाचित्रणाची जबाबदारी व दुसऱ्या मुलाने (कल्पक) निर्मितीसाहाय्य केले आहे. कुटुंबाबाहेरचे केवळ शेखर इंदू (संकलन), ज्ञानेश्वर काशीद (ध्वनी,संगीत) हे हौशी तंत्रज्ञही मित्र परिवारातीलच आहेत. केवळ ८ पिक्सलच्या मोबाईलवर केलेली फिल्म, कचऱ्यातून तयार केलेला जुगाडी ट्रायपॉईड यासाठी वापरलाय. चित्रीकरणासाठी सिगारेट्ससाठीचा केवळ ३० रुपये खर्च सोडता ही झिरो बजेट फिल्मच पण जगभरातील १००+ महोत्सवांत पोचलीये. 

नेहमीचा वर्दळीचा असणारा अवकाश एकदम निर्जन, शांत असा पाहताना जो भावनिक अनुभव येतो तो म्हणजे ‘केनोपसिया’ ( मृदूपवन बोरा / आसामी). हेच शीर्षक असणाऱ्या लघुपटामध्ये एका बांधकाम साइटवर एकटाच अडकलेल्या एका श्रमिकाची भावावस्था अतिशय ताकतीने मांडली आहे. हा मजूर जेव्हा लॉकडाऊनबद्दल पहिल्यांदाच ऐकतो, तेव्हा त्याच्या तोंडी असणारा ‘ये कौनसी बिमारी का नाम है?’ हा प्रश्न एक संहत सामाजिक भाष्यच बनून जाते. 

इराणी दिग्दर्शक जफर पनाही यांच्या ‘धिस इज नॉट अ फिल्म’ आणि ‘टॅक्सी’ या कलाकृतींच्या शैलीने प्रभावित होऊन लॉकडाऊन पार्श्वभूमीवर बनवलेला  ‘इट्स नॉट मी’ ( कूच /तेलगू) हा एक अगदीच व्यक्तिगत माहितीपट, दखलपात्र प्रयत्न आहे. अर्थात पनाहीच्या फिल्म्स जितक्या व्यक्तिगत तितक्याच राजकीय आणि वैश्विक ठरतात. मात्र ‘इट्स नॉट मी’ मात्र व्यक्तिगततेचा परीघ लांघू शकत नाही. स्वीकारलेल्या शैलीस छेद देणारी डेकोरेटिव्ह कलात्मक सुरवातही एकूण फिल्म परिणामाशी फटकून राहते.  ‘अंतहीन’ (संगनिक भट्टाचार्य / बंगाली)चा विषय आणि पार्श्वभूमी जरी लॉकडाऊनचा नसला तरी ती लॉकडाऊनच्या काळात आणि मर्यादेत बनवली आहे व त्या मर्यांदांना आशयसात्म्य करून घेण्याचा प्रयत्नही आहे. त्यादृष्टीने या प्रेम त्रिकोणात आशयानुसारी प्रत्येक व्यक्तिरेखा आपापल्या फ्रेममध्येच राहते.

लघुपट 

रबरबँड’ ( प्रशांत सुतार ) स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर, कचरा सफाई सैनिकाच्या दारुण जीवन वास्तवाचा आधार घेत आणि त्याच्याही पुढे जात त्याच्या मनातील स्वच्छतेची स्वप्नवत व्यापक संकल्पना साकारणारा आहे. यात अभियानकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे प्रखर राजकीय, सामाजिक भाष्य आहे. कथानकाच्या पार्श्वभूमीवर सुरु राहणाऱ्या रेडिओवरील युद्धज्वर वाढविणाऱ्या बातम्या आणि लोकशाहीर विलास घोगरे यांच्या गाण्याचा वापरही महत्वाचा आहे, बाकी कथानक संवादविरहित आहे. यात स्वतः सफाई कर्मचारी असणाऱ्या मारुती काळे यांनीच मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारली आहे. कथा- गिरीष उगळे, छायांकन – जयसिंग चव्हाण, संकलन- प्रसाद महेकर संगीत – ऐश्वर्य मालगावे असा तंत्रचमू आहे. 

सुवर्ण-इफ्फित मिनी मूव्ही मॅनिया स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त ‘अडगळ’ ( प्रसाद महेकर ) मध्ये भावनिक एकटेपण घेऊन आयुष्य ढकलणाऱ्या म्हाताऱ्याच्या पार्श्वभूमीवर सतत मागे पडणाऱ्या घडयाळास वैतागून जेव्हा घरातील तरुण ते दुरुस्त न करता बदलूनच टाकतो तेव्हा केवळ ते काट्याचे घड्याळच नव्हे तर वृद्ध व्यक्ती देखील अडगळीत जमा होते. यातील आशयात्मक कारुण्य व्यक्त होण्यास पोषक ठरेल, अशा फ्रेम्समधील रंगांचा आणि प्रकाशाचा अगदी नेमका वापर, तसेच निवडलेले लोकेशन हे या लघुपटाचे बलस्थान आहे. विषयसूत्र दिल्यापासून ७२ तासात बनवून सबमिट केलेली फिल्म असली तरी ती घाईगडबडीत बनवली आहे, असे जाणवत नाहीत. यासाठी महत्वाचे असते ते म्हणजे मर्यादांचे भान ! या ठिकाणी वेळेचे होते अन्यत्र भांडवलाचे किंवा कुठे ते तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेचे असू शकते. अशा मर्यादांवर मात करणे, महत्वाचे असते. आणि मग येथे वेळेच्या मर्यादेनुसार घेतलेले एकच लोकेशन, मर्यादित व्यक्तिरेखा, जुजबी संवाद असे निर्णय लक्षात येतात. मात्र आशयभान आणि मूलभूत चित्रपटीय तंत्र भाषा याचा कुठेही विसर पडलेला दिसत नाही. ऐश्वर्य मालगावे याचे हळुवार पार्श्वसंगीतही आशयवाही आहे. जयप्रकाश परुळेकर, सागर खुर्द आणि आसावरी नागवेकर यांनी भूमिका केल्या आहेत.  

डॉ. अनमोल कोठाडिया

चित्रपट समिक्षक

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles